अभिभाषणातून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची ग्वाही : विरोधकांचा सभात्याग, बहिष्कार ,राज्यपालांनी भाषणातून घेतला सरकारच्या कामकाजाचा आढावा
पणजी : ‘विकसित गोवा 2047’ चे स्वप्न साकार करण्यासाठी डबल इंजिन सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभेतील अभिभाषणातून दिली. त्याकरीता अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय या तत्त्वांचे पालन करुन ते साध्य करण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे पिल्लई यांनी नमूद केले. दरम्यान, काही विरोधी आमदारांनी सभात्याग करुन राज्यपालांच्या अभिभाषणावर काही वेळ बहिष्कार घातला. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातून राज्य सरकारच्या एकंदरित कामकाजाचा आढावा घेतला. त्यांच्या भाषणाने नवीन वर्ष 2025 मधील पहिल्या अधिवेशनाची सुरुवात झाली. सुमारे एक तासभर केलेल्या भाषणातून त्यांनी राज्य सरकारच्या प्रगती -विकासाचा आलेख मांडला.
राज्यपाल म्हणाले की, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे (आयपीबी) रु. 1459 कोटींच्या एकूण 15 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्राकडून 1307 शेतकऱ्यांना कृषी अवजारे घेण्यासाठी रु. 2.73 कोटीची मदत गोव्यात आली आहे. याशिवाय 3260 शेतकऱ्यांना रु. 4.40 कोटीची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली. मध्यान्ह आहाराचा एकूण 1,54,914 विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. राज्यातील 791 स्वयंसाहाय्य गटांना रु. 36.47 कोटीचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून राज्यात रु. 102 कोटीचे प्रकल्प राबवण्यात आले. 184 संस्थांना रु. 1.37 कोटीचा निधी स्टार्टअपसाठी देण्यात आला आहे. गेल्या 5 वर्षात रु. 174 कोटीची थेट विदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती पिल्लई यांनी दिली.
फसवणाऱ्यांवर ठोस कारवाई
नोकरीचे गाजर दाखवून फसवणूक केली म्हणून पोलिसांनी 43 जणांवर अटकेची कारवाई केली असून तीन प्रकरणात आरोपपत्र सादर केले आहे. या एकंदरित प्रकरणाचे सखोल तपासकाम चालू असून लवकरच कडक व ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी भाषणातून नमूद केले. गोव्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने सुरू असून 2030 पर्यंत ती परिपूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विकास मानांकनात गोवा चौथे
निती आयोगाच्या विकास मानांकनात गोवा राज्य 77 गुण मिळवून चौथ्या म्हणजे चांगल्या स्थानावर विराजमान आहे. आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोवा मोहिमेमुळे हे मानांकन आणखी सुधारता येणे शक्य आहे. नारीशक्ती वाढवणे, तिचे सशक्तीकरण याकरीता एफआयसी विमा सखी योजना गोव्यात राज्य सरकारने सुरू केली आहे. प्रशासनात पारदर्शकता यावी व राहावी म्हणून मुख्यमंत्री हेल्पलाईन सुरू झाली असून तेथे तक्रारी नोंद करण्याची सुविधा देण्यात आली आहे, असे राज्यपाल म्हणाले.
राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ
राज्याचे दरडोई उत्पन्न 24-25 मध्ये रु. 1,21,309 कोटी (जीएसडीपी) असून त्याचे प्रमाण 23-24 च्या तुलनेत वाढले आहे. स्वयंपूर्ण गोवा मोहीम अधिक सक्रिय होण्यासाठी पंचायत, पालिका पातळीवर प्रयत्न होत आहेत. एकूण 56 खेळाडूंना रु. 24.72 लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले असून 33454 जणांना आयुष्मान कार्ड देण्यात आले आहे. रस्ते अपघात भरपाईपोटी 50 जणांना लाभ देण्यात आला असून एकूण रु. 94.60 लाखाची मदत वितरित करण्यात आली आहे. ‘म्हाजी बस’ योजनेतून रु. 37 लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. पिंक पोलिसांकडून सुमारे 5387 फोन कॉल्सना प्रतिसाद व मदत देण्यात आल्याचे पिल्लई यांनी नमूद केले. राज्यपालांनी भाषणातून समाजकल्याण, कृषी, वाहतूक, कायदा-सुव्यवस्था, आरोग्य, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेतली. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार अल्टॉन डिकॉस्ता यांनी सभात्याग करुन शेवटपर्यंत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. ‘आप’चे आमदार व्हेन्झी व्हिएगश, व्रूझ सिल्वा, काँग्रेसचे कार्लुस फरेरा, आरजीचे विरेश बोरकर यांनी सभात्याग केला पण भाषण संपण्यापूर्वी ते परत सभागृहात आले.
मुख्यमंत्र्यांची आलेमांवर खोचक टीका
विधानसभागृहातून अभिभाषणानंतर राज्यपाल बाहेर निघताना विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी गैरहजेरी दाखवून इतिहास रचल्याची खोचक टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आणि खंत वर्तवली. गोव्याच्या विधानसभा अधिवेशन इतिहासात हे प्रथमच घडल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे. ते म्हणाले की, सभागृहाचे पावित्र्य राखण्याची आणि जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पक्षीय किंवा इतर कोणत्याही विषयावर वाद झाले तरी लोकशाहीचा व सभागृहाचा आदर प्रत्येकाने राखलाच पाहिजे असे त्यांनी नमूद केले. राज्यपालांचे सभागृहात आगमन झाले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी आलेमांव हजर होते. त्यानंतर राज्यपालांचे भाषण सुरू झाले तेव्हा आलेमांव यांनी काही विषय मांडून आक्षेप घेतला. मग ते सभागृहातून निघून गेले ते परतलेच नाही. सुमारे एक तासानंतर भाषण संपले तरी आलेमांव आलेच नाहीत. अभिभाषणानंतर राज्यपाल सभागृहाबाहेर निघताना मुख्यमंत्र्यांसमवेत विरोधी पक्षनेत्यांनी सोबत करावी असा शिष्टाचार व प्रथा आहे. ती प्रथा विरोधी पक्षनेत्यांनी मोडली अशी चर्चा सभागृहाबाहेर रंगली होती. आलेमांव यांनी सभात्याग करून राज्यपालांच्या अभिभाषणावर तर बाहिष्कार घातलाच शिवाय त्यांना सभागृहाबाहेर जाताना निरोप देण्याचा पायंडाही चुकवल्याचे समोर आले आहे.
विजय सरदेसाईंकडून चारोळीतून सरकारचा निषेध
गोवा फॉरवर्डचे प्रमुख आणि एकमेव आमदार विजय सरदेसाई यांनी काल गुरुवारी विधानसभेत अभिनव पद्धतीने उभे राहून मूकपणे सरकारचा निषेध नोंदवला. ते सुमारे तासभर निषेधाचा फलक घेऊन उभे होते. ‘नोकरे खातीर दी रोख, भाजप सरकारची एकच मोख, ओगी रावल्यार सुटलो, आवाज काडटा त्याका ठोक’ अशा चारोळीचा फलक त्यांनी हातात घेतला होता. राज्यपालांचे भाषण सुरु होताच ते फलक घेऊन उभे राहिले व त्यांचे भाषण संपेपर्यंत ते उभेच होते. नोकरी घोटाळा, जमीन बळकाव व भाजप सरकारच्या काळातील इतर घोटाळ्dयांकडे त्यांनी फलक दाखवून राज्यपालांसह सर्व आमदारांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे सरदेसाई हे काळे कपडे परिधान करुन आले होते.
अभिभाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांचा गोंधळ
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे अभिभाषण करण्यासाठी उभे राहाताच विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्यासह काँग्रेसचे व आपचे तसेच गोवा फॉरवर्डचे आमदार उभे राहिले. आलेमांव यांनी राज्यपालांना उद्देशून तुमच्या केरळ राज्यात एका वर्षातून सुमारे 50 दिवसाचे विधानसभा अधिवेशन होते आणि गोव्यात बघा दोन दिवसांचे अधिवेशन आहे. त्याचवेळी सभापती रमेश तवडकर यांनी त्यांना आक्षेप घेतला. उद्या शुक्रवारी काय ते बोला असे सांगून आलेमांवना खाली बसण्याची व गप्प राहाण्याची विनंती केली. नंतर समज दिली. यावेळी विधानसभागृहात गोंधळ माजला. त्यातच राज्यपालांनी अभिभाषण सुरु केले. आलेमांवसह सभापती, राज्यपाल बोलत राहिल्याने गोंधळात अधिकच भर पडली. कोण काय बोलते तेच कळेनासे झाले. राज्यपालांचे भाषण होऊ दे त्यांना अडवू नका, खाली बसा अशी विनंती तवडकर यांनी केली. काही क्षण असा गोंधळच चालू होता. काँग्रेस व आपचे आमदार दंडावर काळी पट्टी बांधून आले होते. आमदार कार्लुस फरेरा यांनी तर काळा कोटच घातला होता. लोकशाहीचे धिंडवडे चालू आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे याकडे आलेमांव यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले परंतु ते अभिभाषणात मग्न होते. मग शेवटी विरोधी आमदार गप्प बसले आणि ते बाहेर गेले व भाषण संपण्यापूर्वी पुन्हा सभागृहात आले. आलेमांव मात्र परतले नाहीत आणि सरदेसाई यांनी मूकपणे उभे राहून निषेध केला.
कामकाज सल्लागार समितीच्या अहवालास मान्यता
कामकाज सल्लागार समितीचा (बीएसी) अहवाल विधानसभा अधिवेशनात संमत करण्यास विरोधी आमदारांनी आक्षेप घेतला. तो खोटा असून मान्य नाही असे निवेदन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले. शेवटी आवाजी मतदानाने सभापती रमेश तवडकर यांनी त्या अहवालास मान्यता दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर अहवाल विधानसभेत मांडला. तेव्हा त्यास विरोध करताना विरोधकांचे म्हणणे अहवालात नसल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव आणि इतरांनी लक्षात आणून दिले. लेखी देऊनही त्याचा उल्लेख अहवालात नाही. तो खोटा असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. त्यावेळी झालेल्या गोंधळातच सभापती रमेश तवडकर यांनी अहवाल संमत केला.
विधानसभा अधिवेशनाचे वार्षिक वेळापत्रक तयार करा : सरदेसाई
सरकारने विधानसभा अधिवेशनाचे वार्षिक वेळापत्रक तयार करावे आणि ते राबवावे अशी मागणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गोव्यात वर्षातून किमान 50 दिवस तरी विधानसभा अधिवेशन होण्याची व घेण्याची गरज आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यासाठी फार आग्रही होते. परंतु आताचे सरकार किरकोळ काही दिवसांचीच अधिवेशने घेते. त्यामुळे विविध ज्वलंत विषयावर बोलण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे विरोधी पक्षीय आमदारांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.









