प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त हा लेखनप्रपंच…
रुग्णांसाठी डॉक्टर हा देवदूतच असतो. त्यांच्या कौशल्याने अनेकांना जीवदान मिळते.त्याचप्रमाणे हृदयविकार म्हटले आपसुकच डोळ्यासमोर एकच नाव समोर दिसते, ते म्हणजे प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. एम. डी. दीक्षित होय. हजारो ऊग्णांना पुनर्जन्म देणारे, प्रेमळ, रुग्णांप्रति गंभीर आणि नि:स्वार्थ देवदूत समोर उभा आहे, असे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटते. डॉ. एम. डी. दीक्षित यांनी 1980 मध्ये बेळगावातीलच जेएनएमसी महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळवली. 1984 मध्ये एमएस, तर 1989 मध्ये डीएनबी ही पदवी मिळवली. त्याचबरोबर त्यांनी 2011 मध्ये आपल्या जिज्ञासेतून बायपास शत्रक्रियेवर पीएचडी पदवी मिळवली. 34 वर्षांच्या कारकिर्दीत डॉ. दीक्षित यांनी 40 हजार हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामध्ये 12 हजारांहून अधिक हृदय शस्त्रक्रिया लहान मुलांवर केल्या आहेत. आपल्या या प्रदीर्घ अनुभवांतून त्यांनी हजारो ऊग्णांना नवजीवन दिले आहे. त्यामुळे ऊग्ण व नातेवाईक त्यांना खरोखरच चालता बोलता देव म्हणूनच संबोधतात.
जटिल शस्त्रक्रिया करण्यात तरबेज
हृदयरोग आणि डॉ. एम. डी. दीक्षित हे जणू समीकरणच बनले आहे. देश-विदेशातील नागरिक हृदय शस्त्रक्रियेसाठी डॉ. दीक्षित यांच्याकडे येत आहेत. कोणतीही जटिल शस्त्रक्रिया असली तरी डॉ. दीक्षित हे आपल्या अनुभव कौशल्याने शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात तरबेज आहेत. यामध्ये 1 महिन्याच्या बाळांपासून ते 80 वर्षांच्या वयोवृद्धांचा समावेश आहे. म्हणूनच रुग्णांसह त्यांचे कुटुंबीयसुद्धा डॉ. दीक्षित यांना वैद्यकीय क्षेत्रातील देवदूतच मानतात.
आपल्या हृदयाची काळजी गरजेची
हृदय निरोगी राखण्यासाठी डॉ. दीक्षित काही पदार्थांपासून सावध राहण्याचा सल्ला देतात. मीठ, साखर, मैदा, बेकरी पदार्थ, सोडा, चरबीयुक्त पदार्थ आदींपासून सावध राहावे, जेणेकरून आपल्या हृदयाची काळजी घेऊ शकू, असे डॉ. दीक्षित म्हणतात.
हृदयाची काळजी कशी घ्यावी
हृदयरोग टाळण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न केले पाहिजेत. गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ, चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे बंद करायला हवे. किमान 40 मिनिटे रोज चालत राहणे, सकस आहार, दररोज पुरेशी झोप, तणाव घेऊ नये, वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक असून मधुमेह, रक्तदाबही नियंत्रित ठेवावा. तरुण पिढीने हृदयाची काळजी गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईलचा अति वापर टाळून नकारात्मक विचार टाळून काम करताना आनंद शोधा, असा सल्ला ते देतात. सामान्य रुग्णांना सर्वोत्कृष्ट ऊग्णसेवा मिळावी, या उद्देशाने डॉ. एम. डी. दीक्षित व सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी अरिहंत हॉस्पिटलची स्थापना केली. हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो ऊग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. डॉ. दीक्षित यांनी उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व गोव्यातील रुग्णांना जीवनदान तर दिले आहेच, शिवाय त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविले आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला व त्यांच्या नि:स्वार्थ ऊग्णसेवेला सलाम. एक प्रेमळ डॉक्टर म्हणून परिचित असणाऱ्या डॉ. एम. डी. दीक्षित यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
– प्रतिनिधी









