सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेचे काम काही महिन्यांपासून ठप्प : दूषित पाण्याचाच शहराला पुरवठा : नगरसेवकांनी लक्ष घालण्याची गरज
खानापूर : शहराजवळून वाहणाऱ्या मलप्रभा नदीघाटाजवळ नव्याने ब्रिजकम बंधाऱ्यात तसेच जळगा येथील बंधाऱ्यात मलप्रभा नदीचे पाणी अडविण्यात आले आहे. मात्र मलप्रभा नदीत संपूर्ण शहराचे आणि उपनगरांचे सांडपाणी मिसळत असल्याने मलप्रभेचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हेच पाणी यंत्रणेद्वारे शहराला पुरविण्यात येते. सध्या जेबीएस सिंड्रोम रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरलेला असताना नगरपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी शहरातील सांडपाणी एकत्र करून त्याचे शुद्धीकरण करून ते पुन्हा ‘मलप्रभे’त सोडण्याची योजना मंजूर झाली आहे. गेल्या तीन वर्षापासून या योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. पण, गेल्या काही महिन्यापासून या योजनेचे काम पूर्णपणे बंद असल्याने ही योजना अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे यावर्षीही मलप्रभा प्रदूषित होण्यापासून रोखण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेवकानी आता नगरपंचायतीचा कारभार आपल्या हाती घेतला आहे. ‘मलप्रभे’चे प्रदूषण रोखण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
पुढील पाच वर्षेही कामाची जबाबदारी कंत्राटदाराचीच
मलप्रभा नदीत शहराचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीपात्र पूर्णपणे प्रदूषित होत आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पुन्हा नदीत सोडण्याची एसटीपी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेत म्हणावा तसा पाठपुरावा झाला नसल्याने ही यंत्रणा वेळेत कार्यान्वित होऊ शकली नाही. मात्र केंद्राच्या हरीत लवादाकडून वेळेत काम पूर्ण करण्याचा तगादा लावल्यामुळे कर्नाटक शहरी पाणीपुरवठा आणि डेनेज बोर्डाने या योजनेचे काम सुरू केले आहे. मार्च 2024 साली ही यंत्रणा पूर्णपणे उभारुन कार्यान्वित करणे गरजेचे होते. मात्र गेल्या वर्षभरापासून अत्यंत संथगतीने या योजनेचे काम सुरू आहे. गेले तीन महिने या योजनेचे काम पूर्णपणे बंद असल्याने यावर्षीही ही योजना कार्यान्वित होणार नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत नगरपंचायतीच्या अभियंत्यांना विचारले असता ते म्हणाले, कर्नाटक अर्बन वाटर बोर्ड यांच्यामार्फत या योजनेचे काम सुरू आहे. योजना कार्यान्वित करून पाच वर्षें कंत्राटदारानीच या योजनेची देखभाल करण्याचे आहे. त्यानंतर ही योजना नगरपंचायतीकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या योजनेत आम्ही कोणाताही हस्तक्षेप करू शकत नाहीत, असे सांगण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून दूषित पाणी शुद्धीकरण यंत्रणा खानापूर शहरासाठी मंजूर झाली होती. या योजनेसाठी 6 कोटी 28 लाख रु. चा निधी मंजूर झाला आहे. शहराचे मलप्रभेत मिसळणारे सांडपाणी शुद्धीकरण करण्यासाठी दुर्गानगर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रानजीकच्या पुलाशेजारी एक, घाटानजीकच्या ब्रिजकम बंधारा येथे एक, पारिश्वाड रस्त्यावरील पुलाशेजारी एक अशा तीन ठिकाणी सांडपाणी एकत्रिकरण करण्यासाठी तीन विहिरी बांधण्याचे काम सुरू आहे. या तिन्ही विहिरीतून मोटारीद्वारे हे सांडपाणी उपसा करून पाईपलाईनद्वारे जैन प्लॉट येथे एकत्रिकीकरण करण्यात येणार आहे. जैन फ्लॉट येथे 30 × 30 रुंदीचा जमिनीपासून 10 फूट उंच 35 कॉलमवर प्लॉटफार्म तयार करण्यात येणार आहे. या यंत्रणेतून शहरातील सांडपाणी एकत्रित करून ते शुद्ध करून पुन्हा मलप्रभा नदीत सोडण्यात येणार आहे.
विहिरींचे कामही अर्धवट
या ठिकाणी काही टँक उभारण्यात आले आहेत. मात्र पुढील काम पूर्णपणे थांबले आहे. घाटाजवळील बंधाऱ्याच्या ठिकाणी सांडपाणी एकत्र करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या विहिरीचे कामही अर्धवट आहे. तसेच पारिश्वाड क्रॉसजवळील पुलाशेजारी उभारण्यात येत असलेल्या विहिरीचे कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे.
अडीच वर्षापासून प्रशासक काम
नगरपंचायतीवर गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक काम पहात होते. नुकतीच अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक झाली असून, आता नगरपंचायतीचा कारभार नगरसेवकांच्या हाती आला आहे. आता नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक मलप्रभेचे प्रदूषण रोखण्यासाठी या योजनेचा पाठपुरावा करून ही योजना पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित करतील का, आणि मलप्रभेचे प्रदूषण रोखतील का, असाच प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
तांत्रिक अडचणीमुळे कामाला उशीर – अभियंते मंजुनाथ
याबाबत कर्नाटक अर्बन वाटर बोर्डाचे अभियंते मंजुनाथ यांच्याशी संपर्क साधला असता काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर झाला आहे. मात्र या योजनेचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात गेल्या महिन्यापासून योजनेचे कामच बंद आहे. असे विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नाकार दिला आहे.









