सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : रस्त्याची वाताहत : नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला रस्ताकाम रखडले आहे. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान तातडीने कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली होती. याबाबत म. ए. समितीने लढा उभा करून कामाला तातडीने चालना द्यावी, अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली दिसत नाही. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील गांधी स्मारक ते बाची दरम्यानच्या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली होती. त्यामुळे सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी यासाठी म. ए. समितीने वारंवार सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनेही दिली होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याने हिंडलगा ते सुळगा दरम्यानच्या रस्त्यासाठी 9 कोटींचा निधी तर सुळगा ते बाची दरम्यानच्या मार्गासाठी 7 कोटींचा निधी खर्ची घातला जाणार असल्याचेही सांगितले होते.
सद्यस्थितीत गांधी स्मारक ते मिलिटरी विनायक मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र त्यापुढील रस्त्याची केविलवाणी परिस्थिती जैसे थेच आहे. या मार्गासाठी पुन्हा म. ए. समिती लढा उभा करणार का? हेच पहावे लागणार आहे. हिंडलगा, सुळगा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे हटविण्यात आली आहेत. शिवाय या मार्गासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही. बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील हिंडलगा ते सुळगा दरम्यान रस्ता चौपदरीकरण केला जाणार आहे. आणि तेथून पुढे म्हणजे सुळगा गावापासून बाचीपर्यंत रस्त्याचे केवळ नूतनीकरण केले जाणार आहे. असे असले तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. दोन महिन्यांपूर्वी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची चाके जलदगतीने सुरू झाली. रस्त्याचा सर्व्हे आणि रस्त्याशेजारील झाडे हटविण्यात आली. मात्र त्यानंतर रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. निविदा प्रक्रिया राबवूनही कामाला प्रारंभ झाला नसल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे.









