अन्यथा सदस्यांचे नाव कमी : अन्न-नागरी पुरवठा खात्याची माहिती
बेळगाव : अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी सक्तीची केली आहे. मात्र अद्यापही काही लाभार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता ई-केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांची रेशनकार्डमधून नावे कमी करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिला आहे. विवाह, मृत्यू व स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांच्या रेशनमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि रेशनपुरवठा सुरळीत करण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. मात्र काही लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. अशा लाभार्थ्यांना दणका बसणार आहे. त्यांची नावे रेशनकार्डमधून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात 99 टक्के रेशनकार्ड ई-केवायसीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र केवळ 1 टक्का लाभार्थ्यांनीच ई-केवायसी केलेली नाही. याबाबत रेशन दुकानदारांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ई-केवायसीची मोफत सुविधा रेशन दुकानामध्येच उपलब्ध असून संबंधितांनी करून घ्यावे, असे आवाहनही खात्याने केले आहे.
आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्यांनी स्वत:हून कार्डे परत करावीत…
सरकारी नोकर, आयकर भरणारे आणि आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्यांनी महिन्याभरात स्वत:हून रेशनकार्डे जमा करावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. रेशनकार्ड रद्द करण्याबरोबरच आतापर्यंत घेतलेल्या रेशन आणि इतर लाभाचा परतावा घेतला जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्यांनी स्वत:हून बीपीएल कार्डे जमा केल्यास त्यांना एपीएल कार्डे दिली जाणार आहेत.









