अध्याय सहावा
अंतकाळी ईश्वराचं स्मरण राखून जो देह सोडतो तो नि:संशय ईश्वराला जाऊन मिळतो. याचं कारण असं की, आयुष्यभर ज्या भावात मनुष्य रंगलेला असतो तोच भाव अंतसमयी मनात येतो. अंतसमयी ईश्वराचा आठव होण्यासाठी ईश्वराला मन आणि बुद्धीचं समर्पण करून, सर्वकाळ त्याला आठवत आपली कर्तव्यकर्मे निरपेक्षतेनं पार पाडली की, ईश्वराच्या पायाशी भक्ताची जागा निश्चित होते. आयुष्यभर याच कारणावर चित्त एकाग्र करायचं असून शेवटी ईश्वरी तत्वात मिसळून जायचं आहे. बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत की, ईश्वर निर्गुण, निराकार आहे पण भक्त निरनिराळ्या सगुण रूपातील त्याच्या आवडत्या दैवताची उपासना करत असतो. त्यामुळे अंतकाळी आपल्या उपास्य दैवताचे स्मरण करत तो देह सोडतो आणि त्याला त्याची उपास्य देवाचा रहात असलेला लोक प्राप्त होतो.
यं यं देवं स्मरन्भक्त्या त्यजति स्वं कलेवरम् ।
तत्तत्सालोक्यमायाति तत्तद्भक्त्या नराधिप।।17।।
अर्थ-हे राजा, ज्या देवाचे भक्तिपूर्वक स्मरण करून मनुष्य आपल्या देहाचा त्याग करतो तो त्या देवाच्या लोकाप्रत जातो.
विवरण-नेहमी उपास्य देवतेचे स्मरण करत असावे असे संत, सद्गुरु सांगतात. त्याच्या लीला, त्याच्या चरित्रातले प्रसंग नेहमी स्मरावेत. भक्ताने अंतकाळी ज्या देवतेचे स्मरण करावे त्या लोकाला तो जातो. म्हणजे अंतकाळी ज्या देवतेचे चिंतन होत असते त्याच्या चिंतनात तो जीव पुनर्जन्म होईस्तोवर राहतो. त्या चिंतनानुसार तो पुढील शरीर धारण करतो. थोडक्यात पुढच्या जन्माची प्राप्ती आधीच्या जन्माच्या अंत्यसमयी केलेल्या चिंतनानुसार होत असते. माणसाला देवाने विचार आणि आचार स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे आपण काय केले की, आपले भले होईल हे तो ठरवू शकतो. त्यामुळे अंतकाळचे स्मरण त्याच्या पूर्वीच्या कर्माच्या आधीन नसून त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. अंतकाळी फक्त मनुष्यच ईश्वराचे स्मरण करून वर्तमानातले सर्व संबंध तोडून ईश्वराप्रति पोहोचू शकतो. म्हणून बाप्पा पुढील श्लोकात म्हणतात की, ईश्वराचे अहर्निश स्मरण करावे.
अतश्चाहर्निशं भूप स्मर्तव्योऽनेकरूपवान् ।
सर्वेषामप्यहं गम्यऽ स्रोतसामर्णवो यथा ।।18।।
अर्थ-हे राजा, अनेक रूपे धारण करणाऱ्या माझे अहर्निश स्मरण करावे, जसा समुद्र नदी, नाले या सर्वांना सामावून घेतो त्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मी सर्वांना सामावून घेतो.
विवरण-शेवटी ईश्वराचं स्मरण केलं की, ईश्वराप्रति पोहोचता येतं असं असेल तर मी मग शेवटीच ईश्वराचं स्मरण करीन असं जर एखादा म्हणेल तर तसं घडत नाही. त्यासाठी सतत ईश्वराचं स्मरण करावं लागतं. तसं केलं तरच अंत्यसमयी ईश्वराचं स्मरण होईल. ऐनवेळी मी करीन असं ठरवून चालणार नाही. दैनंदिन व्यवहारातसुद्धा असा अनुभव आपण घेत असतो. उद्या एखादे महत्त्वाचे काम करायचे असल्यास आदल्या दिवसापासून आपण उद्या अमुक काम करायचं आहे असं घोकत असतो व त्यादिवशी ठरलेल्या वेळी अचूकपणे ते काम करत असतो असा अनुभव आहे. म्हणून ईश्वराचे अहर्निश म्हणजे दिवसरात्र स्मरण करावे म्हणजे अंत्यसमयी त्याची आठवण होईल. त्याचा दुसरा एक फायदा असा होतो की, ईश्वर सतत आपल्याबरोबर आहे ह्या जाणिवेने आपण दु:ख संकटात एकटे नसून ईश्वर आपल्यासोबत आहे या कल्पनेने मनाला सतत धीर मिळेल. तसेच सततच्या ईश्वरस्मरणामुळे आपल्या हातून गैरकृत्ये आपोआप टाळली जातात. जागेपणी एकवेळ ईश्वरस्मरण शक्य आहे पण झोपल्यावर कसं करणार,प्रश्न विचारल्यावर श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले, तुम्ही जागेपणी सतत स्मरण करत राहिल्यास, तुम्ही झोपल्यावर मी तुमच्या वतीने स्मरण करीन.








