शासनाने काढला आदेश: आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे राहणार
इचलकरंजी
येथील आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे इचलकरंजी महापालिकेचे प्रशासक म्हणून असलेला पदभार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी याबाबतचा आदेश बुधवार ५ रोजी काढला. यामुळे शहरात अनेक तर्कवितरकांना उधाण आले आहे .
इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिले
आयुक्त तथा प्रशासक म्हणून सुधाकर देशमुख यांनी कार्यभार स्विकारला. त्यांच्या बदलीनंतर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यभार आला. गेल्या वर्षभराच्या काळात आयुक्त दिवटे यांनी महापालिकेचे प्रशासकीय कामकाज सक्षमपणे सांभाळले आहे. तर शहरात अनेक विकासकामे गतीने सुरू आहेत. मधल्या काळात इचलकरंजीचे माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्याशी त्यांचा विसंवाद असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत दोनही बाजूकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त होत नसली तरीही अनेक कार्यक्रमावेळी व्यक्त होण्राया मनोगतामध्ये ही खदखद दिसत होती. यामुळे यातून काहीतरी निष्पन्न होणार अशी चर्चा जोर धरत होती .
बुधवार ५ रोजी शासनाने अचानकपणे एक आदेश काढत आयुक्त दिवटे यांच्याकडे असलेला इचलकरंजी महापालिका प्रशासक पदाचा कार्यभार हा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे यापुढे ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे केवळ आयुक्तपदाचा कार्यभार असणार आहे .
यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे होता तात्पुरता कार्यभार
यापूर्वीही आयुक्त सुधाकर देशमुख व ओमप्रकाश दिवटे यांच्या रजेच्या कालावधित इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त व प्रशासकपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच होता. पण या काळात कार्यबाहुल्यामुळे एकदाही जिल्हाधिकाऱ्यांना इचलकरंजी महापालिकेत येणे जमले नव्हते. त्यामुळे कामे प्रलंबित राहत होती. आता तर प्रशासक पदाचा संपूर्ण कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
Previous Articleसोने ८७ तर चांदी ९८ हजारवर….
Next Article स्थानिक संस्था कर विभाग बंद करा








