क्रेडाई बेळगावची महानगरपालिकेकडे मागणी : उपनोंदणी अधिकाऱ्यांनी काढला तोडगा
बेळगाव : अपार्टमेंट अथवा घर खरेदी करताना रजिस्टर अॅग्रीमेंट गरजेचे असते. परंतु रजिस्टर अॅग्रीमेंट करताना ई-अस्ती व पीआयडी क्रमाकांची सक्ती केली जात आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना ई-अस्ती अथवा पीआयडी क्रमांक देणे शक्य नसते. त्यामुळे महापालिकेने रजिस्टर अॅग्रीमेंटला पीआयडी क्रमांक अथवा ई-अस्तीची सक्ती करू नये, अशी मागणी क्रेडाई बेळगावच्यावतीने महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेळगावमध्ये अनेक बांधकाम प्रकल्प उभे राहात आहेत. एखादा प्रकल्प पूर्ण होण्यास 20 ते 28 महिन्यांचा कालावधी लागत असतो. विक्री न झालेल्या मालमत्तांचा व्यवहार होण्यास विलंब लागतो. बहुतेक घर खरेदी, फ्लॅट खरेदी ही बँकांच्या कर्जावर अवलंबून असते. बँका गृहकर्ज मंजूर करण्यासाठी विक्री करारचा (सेलडीड) आग्रह धरतात. परंतु रजिस्टर ऑफिसमध्ये पीआयडी क्रमांकाशिवाय नोंदणी शक्य नसते. यामुळे घर खरेदीदार, बिल्डर व डेव्हलपर अडचणीत सापडले आहेत.
अॅडव्हान्स पावती अथवा रजिस्टर अॅग्रीमेंटमुळे पीआयडीची सक्ती केली जात आहे. यामुळे बिल्डर व डेव्हलपर अडचणीत तर येत आहेतच, त्याचबरोबर घर खरेदी करणारी व्यक्तीही त्रास सहन करत आहे. त्यामुळे महापालिकेने काही अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी क्रेडाईच्यावतीने करण्यात आली. आयुक्त शुभा बी. व उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या सूचनेनुसार बुधवारी जिल्हा उपनोंदणी अधिकारी महांतेश पटातर यांची भेट घेण्यात आली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्येवर तोडगा शोधून काढला. इमारतीचे बांधकाम सुरू असताना तळमजल्यातील एका ई-अस्तीवर नोंदणी केली जाईल व त्यानंतर जसे बांधकाम पूर्ण होईल तशी प्रत्येक फ्लॅटची ई-अस्ती नोंदणी होईल, असे स्पष्ट केले. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, गोपाळराव कुकडोळकर, अमर अकनोजी, युवराज हुलजी, प्रशांत वांडकर, आनंद अकनोजी, सुधीर पनारे, महेश फगरे, राजेश कांबळे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
क्रेडाईने मानले आभार
मनपा आयुक्त शुभा बी. व उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी क्रेडाईच्या सदस्यांची समस्या जाणून घेत त्यांना जिल्हा उपनोंदणी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. उपनोंदणी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्यावसायिकांना तोडगा काढून दिला. त्यामुळे मनपा आयुक्त, उपायुक्त, तसेच उपनोंदणी अधिकाऱ्यांचे क्रेडाईने सत्कार करत आभार मानले.









