कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने 1886 साली कोल्हापूर–मिरज या मार्गावर रेल्वे सेवा सुरु केली. या रेल्वे मार्गाचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले.पण इतक्या वर्षात कोल्हापूर रेल्वेची गती आणि नवीन रेल्वे गाड्या वाढणे अपेक्षित होते. अजूनही कोल्हापूर–मिरज हा रेल्वे मार्ग एकेरीच आहे. या मार्गाचे दुहेरीकरण होण्याची नितांत गरज आहे. दुहेरीकरण झाले तरच नवीन अन्य मार्गावर गाड्या सुरु होणार आहेत.
रेल्वेचा प्रवास परवडणारा आणि सुरक्षित असल्याने प्रवाशांची पहिली पसंदी रेल्वेला असते. पण सद्या वाढलेल्या गर्दीमुळे रेल्वेचा प्रवास असुरक्षित बनला आहे अशी भावना रोजच्या प्रवाशातून होत आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसचे प्रवासी असुरक्षितता अनुभवत आहेत. कोल्हापूर–मुंबई मार्गावर महालक्ष्मी आणि कोयना या एक्सप्रेस धावतात. महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री धावते आणि कोयनेपेक्षा तिचा वेगही अधिक आहे. यामुळे नोकरदारासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेस सोयीस्कर आहे. कोरोनापासून कोल्हापूर–मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस बंद केली आहे. प्रवाशांनी मागणी करुनही ही गाडी अद्याप सुरु केली नाही. यामुळे प्रवाशांचा सर्व ताण महालक्ष्मी एक्स्प्रेसवर पडत आहे. आगाऊ तीन महिने महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण केले तरच तिकिट मिळते. ऐनवेळी प्रवास करायचा म्हटले तरी या गाडीचे तिकिट मिळू शकत नाही.
महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईहून सातारा–सांगली–मिरज–कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांना नेहमीच कटु अनुभवाला सामेरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून या गाडीत कल्याणपर्यंतचे स्थानिक प्रवासी गर्दी करतात. आरक्षित डब्यातही स्थानिक प्रवासी गर्दी करत असल्याने सातारा–सांगली–मिरज–कोल्हापूरच्या प्रवाशांचे आरक्षण असूनही कल्याणपर्यंत त्यांना ताटकळत उभा राहून प्रवास करावा लागत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसचे कोच वाढवण्यासह ते बदलण्याचीही गरज आहे. तसेच बंद केलेली सह्याद्री एक्स्प्रेस सुरु करुन अन्य एक जलदगती एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.
- कोल्हापूरातून सुटणाऱ्या सर्वच रेल्वे हाऊसफुल्ल
कोल्हापूरातून सद्या मुंबई, धनबाद, दीक्षाभूमी, कलबुर्गी, अहमदाबाद, तिरुपती या मार्गावर एक्सप्रेस गाड्या धावतात. या सर्वच एक्स्प्रेस हाऊसफुल्ल असून प्रवाशांची गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी किमान हंगामी विशेष रेल्वे सुरु करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.
- डझनभर अधिकारी बदलले पण प्रश्न अधांतरीच
पुणे विभागातील कित्येक रेल्वे अधिकाऱ्यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. किमान दीड ते दोन महिन्यांनी अधिकाऱ्यांचा कोल्हापूर दौरा होतो. कोल्हापूर आले की त्यांचा सर्वाधिक वेळ दर्शनात जातो. यानंतर काही मिनिटात रेल्वे स्थानकाची पाहणी करुन स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. तर रेल्वे प्रवाशांची दखलही घेतली जात नाही. कोल्हापूर मुंबई मार्गावर आणखी एक रेल्वे, कोल्हापूर पुणे शटल सर्व्हिस, अन्य मार्गावर नवीन गाडयांची मागणी आहे. पण या मागण्यांना आतापर्यंत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.डझनभर अधिकारी निवृत्त झाले. पण कोल्हापूर रेल्वेचे प्रश्न सुटले नाहीत.
- कोल्हापुरातून सुटणाऱ्या एक्सप्रेस
महालक्ष्मी एक्सप्रेस,कोयना एक्सप्रेस,निजामुद्दीन्न (दिल्ली),हैद्राबाद, महाराष्ट्र एक्सप्रेस-(नागपूर),अहमदाबाद, तिऊपती,धनबाद एक्सप्रेस
- लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
कोल्हापूर रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी कोल्हापूर–मिरज दुहेरीकरण हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रासह देशातून व्यापारी, पर्यटक कोल्हापुरात येतात. पण त्यांच्यासाठी रेल्वेच्या म्हणाव्या तितक्या सुविधा नाहीत. रेल्वेला गती आणि गाड्यांची संख्या वाढण्यासाठी कोल्हापूर–मिरज रेल्वेचे दुहेरीकरण होणे महत्वाचे असून लोकप्रतिनिधीनी लक्ष घातले पाहिजे.
फिरोज शेख–सामाजिक कार्यकर्ता








