एलअँडटीकडून जलवाहिन्या घालण्याचे काम संथगतीने : काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : गोंधळी गल्ली येथे एलअँडटी कंपनीकडून जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. परंतु हे काम संथगतीने सुरू असल्याने धुळीमुळे नागरिक वैतागले आहेत. परिसरात अनेक फूड स्टॉल व हॉटेल व्यावसायिक असल्याने त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. वाढत्या धुळीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारताच अखेर धुळीवर काही कालावधीने पाणी मारले जात आहे. सन्मान हॉटेल कॉर्नरपासून गोंधळी गल्लीत जलवाहिन्या घातल्या जात आहेत. मागील आठ दिवसांपासून काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूने खोदाई करून जलवाहिन्या घातल्या जात आहेत. जलवाहिन्या घातल्यानंतर त्यावर माती घालण्यात आली आहे. परिसरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकीवरून ये-जा करणेही तापदायक ठरत आहे. त्यामुळे नागरिक पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्यामुळे काहींनी तर दुकानांना प्लास्टिकचे आवरण घातले आहे. परंतु सर्वच दुकानदारांना हे शक्य नसल्यामुळे दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कंत्राटदाराला धारेवर धरताच धूळ उडू नये यासाठी पाणी मारले जात आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे.
व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प
गोंधळी गल्ली परिसरात फूड स्टॉल, फास्ट फूड सेंटर तसेच हॉटेलची संख्या अधिक आहे. परंतु आठवडाभरापासून सुरू असलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. धुळीमुळे खाद्य पदार्थ खराब होत असून ग्राहक फिरकत नसल्यामुळे दुकाने बंद करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे या दुकानदारांना दररोज हजारो रुपयांचा फटका बसत आहे.









