24 वर्षांनी होणाऱ्या यात्रेला 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ : चार दिवस गावातून मिरवणूक
वार्ताहर/हलशी
नंदगड येथे 24 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण नंदगड गाव सज्ज झाले आहे. यात्रेच्या तयारीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, घरांची रंगरंगोटी, विद्युतरोषणाई, मंडप यासह इतर तयारी आता सुरू असून संपूर्ण गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. महालक्ष्मी यात्रा दि. 12 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तब्बल 23 फेब्रुवारीपर्यंत यात्रा चालणार आहे. दि. 12 ते दि. 16 पर्यंत लक्ष्मी गावातून फिरणार आहे. यावेळी ग्रामस्थांच्या, मानकऱ्यांच्या, बनकऱ्यांच्या ओट्या स्वीकारणार आहे. पहिल्या दोन दिवसांनंतर महालक्ष्मी रथावर आरुढ होऊन रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. गदगेच्या ठिकाणी यात्रा कमिटीच्यावतीने भव्य अशा राम मंदिराची प्रतिकृती निर्मितीचे काम सुरू असून यात्रेच्या पूर्वी मंदिराचे काम पूर्ण होणार आहे.
चोख पार्किंग व्यवस्था
यात्रेच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेसाठी यात्रा कमिटीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. सर्व ग्रामस्थांनी घराला रंगकाम करून घेतले आहेत. सर्व नातेवाईकांना व्यक्तीशा आमंत्रण देण्यात येत आहे. पहिले पाच दिवस महालक्ष्मी देवीचे रथातून संपूर्ण नंदगडमध्ये भ्रमण होणार आहे. त्यानंतर देवी गदगेवर बसणार आहे. 24 वर्षानंतर यात्रा होत असल्याने या यात्राकाळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे.
पोलीस प्रशासन-खासगी सुरक्षा रक्षकांची मदत घेणार
नंदगड ग्राम पंचायत तसेच यात्रा कमिटी, पोलीस स्थानक यांनी जत्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली असून, यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सेवेसाठी पेन्डॉल घालून व्यवस्था करण्यात आली आहे. यात्राकाळात रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून त्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कमिटीने वेगवेगळ्या कमिटीच्यामार्फत नियोजन केले असून्। प्रत्येक कमिटीवर यात्राकाळात जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महालक्ष्मी देवीसाठी सुसज्ज असे मंदिर बांधण्यात आले आहे. महालक्ष्मी देवीचे सर्व कार्यक्रम आणि दर्शन सर्व भाविकांना व्यवस्थित पाहता यावेत, यासाठी गावांमध्ये ठिकठिकाणी मोठमोठ्या एलईडी क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची तसेच खासगी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली जाणार आहे.









