राष्ट्रीय वारसा घोषित
डेन्मार्कच्या स्टेवन्स क्लिफ्समधून एक थक्क करणारा शोध समोर आला आहे. वैज्ञानिकांनी 6.6 कोटी वर्षे जुनी शार्कची उलटी (फॉसिलाइज्ड वोमिट) शोधली आहे. तसेच डेन्मार्क सरकारने आता याला राष्ट्रीय वारशाचा दर्जा दिला आहे. हा शोध एक जीवाश्म शोधकर्ते पीटर बेनिके यांनी लावला आहे.
तज्ञांनुसार ही उलटी क्रेटेशियस काळातील आहे, तेव्हा युरोप अनेक बेटांमध्ये विभागलेला होता आणि समुद्राची पातळी उंच होती. या उलटीविषयी डेन्मार्कचे जियोम्युझियम फाक्सेचे क्यूरेटर डॉ. जेस्पर मिलान यांनी प्राचीन सागरी शिकारी शार्कने सी लिली नावाचा जीव फस्त केला होता, परंतु त्याच्यात सांगाड्यासारखी संरचना असल्याने शार्कला तो पचविता आला नाही आणि त्याने उलटी केल्याचे सांगितले आहे.
सी लिली खाण्यासाठी चांगला नसतो, कारण तो जवळपास पूर्णपणे हाडांनी तयार झालेला असाते. याचमुळे शार्कने शक्य तितके पचविले आणि उर्वरित उलटीद्वारे शरीराबाहेर टाकले. ही पांढरी उलटी चॉक क्लिफ्सनजीक मिळाली, जे युनेस्कोकडून संरक्षित एक महत्त्वपूर्ण भूवैज्ञानिक स्थळ असल्याचे डॉ. मिलान यांनी सांगितले आहे. नेदरलँडचे सागरीजीव तज्ञ जॉन जॅग्ट यांनी या उलटीत दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या सी लिलीचे अवशेष मिळाल्याची पुष्टी दिली आहे. या अवशेषांमध्ये केवळ त्यांचा अपचनीय सांगाड्याचाच भाग अस्तित्वात आहे.
शोध अत्यंत महत्त्वपूर्ण
हा शोध वैज्ञानिकांना संबंधित काळातील सागरी स्थिती आणि जीवांच्या आहाराच्या सवयी समजून घेण्यास मदत करणार आहे. डॉ. मिलान यांच्यानुसार फॉसिलाइज्ड उलटीला वैज्ञानिक भाषेत ‘रेगर्जिटलाइट’ म्हटले जाते. परंतु ही जगातील सर्वात जुनी उलटी नाही. जर्मनीत याहूनही प्राचीन 15 कोटी वर्षांपूर्वीचीची उलटी आढळून आली आहे.
विक्री होणार नाही
डेन्मार्कच्या सरकारने या उलटीला असाधारण नैसर्गिक ऐतिहासिक महत्त्वाची वस्तू म्हणून वर्गीकृत केले आहे. याचा अर्थ उलटी आता सरकारची संपत्ती असून ती विकली जाऊ शकत नाही. तसेच अन्यत्र नेता येणार नाही.









