गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचा इशारा : राज्य सरकारकडून शिक्षेच्या कालावधीत वाढ, 5 लाखांचा दंड
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्जाची सक्तीने वसुली करून कर्जदारांचा होणारा छळ टाळण्यासाठी राज्य सरकारने मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांना ठोठावण्यात येणारी तीन वर्षांची शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढविली आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. बेंगळुरातील सदाशिवनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते.
मायक्रो फायनान्सकडून जबरदस्तीने कर्ज वसूल करून घरे जप्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हताश झालेला कर्जदार आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी यापूर्वीच अध्यादेश तयार करून तो स्वाक्षरीसाठी राजभवनाकडे पाठवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्यांना 3 वर्षांची शिक्षा होती. आता आम्ही या शिक्षेचा कालावधी 10 वर्षांपर्यंत वाढविला आहे. या संदर्भात आकारण्यात आलेला दंड आम्ही 5 लाखांपर्यंत वाढवला आहे. कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे गृहमंत्री परमेश्वर यांनी स्पष्ट केले.
केवळ नावासाठी कायद्याची अंमलबजावणी केली तर अशा छळाच्या घटनांना आळा बसू शकत नाही. यासाठी आम्ही दंड आणि शिक्षेत वाढ केली आहे. कठोर कायद्यामुळे छळ थांबण्यास मदत होते. मायक्रो फायनान्स संस्था?च्या त्रासाला आळा घालण्यासाठी आम्ही अध्यादेशाच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्यासाठी राजभवनाला पाठवले आहे. राज्यपाल प्रवासावर असल्याने ते आज त्यावर स्वाक्षरी करतील की नाही हे मला माहीत नाही. अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मायक्रो फायनान्स कंपन्या या अध्यादेशविरोधात न्यायालयात जाऊ नयेत यासाठी हे विधेयक तयार करण्यास उशीर झाला आहे. पहिला मसुदा तयार झाला तेव्हा आम्ही त्यावर चर्चा केली होती. कंपन्यांनी न्यायालयात धाव घेऊ नयेत, यासाठी सर्व प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. यासंदर्भात कायदा खात्याला कळवण्यात आले असले तरी दोन दिवस उशीर झाला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही मसुदा तयार केला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या न्यायालयात गेल्या तरी सरकारची पिछेहाट होणार नाही, असेही परमेश्वर म्हणाले.
गायी चोरणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारा, या मंत्री मंकाळ वैद्य यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना परमेश्वर म्हणाले, याची माहिती आपल्याला नव्हती. मंत्र्यानी वैयक्तिकरित्या काहीतरी सांगितले असेल. याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.









