टाटा स्टील मास्टर्स : दोन्ही खेळाडू संयुक्तपणे आघाडीवर, शेवटच्या फेरीत गुकेशची गाठ अर्जुन एरिगेसीशी
वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी, नेदरलँड्स
जागतिक विजेता डी. गुकेशने रविवारी हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टशी बरोबरी साधली, तर ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सर्बियाच्या अॅलेक्सी सरानाचा पराभव केला. यामुळे टाटा स्टील मास्टर्समधील आणखी एका रोमांचक दिवसानंतर वरील दोन्ही भारतीयांनी संयुक्तपणे आघाडी घेतली आहे.
प्रज्ञानंदने सलग तिसरा विजय मिळवत 12 व्या फेरीनंतर त्याचे गुण 8.5 वर पोहोचविले आहेत. हे दोन्ही भारतीय खेळाडू आता या प्रतिष्ठित स्पर्धेत रोमांचक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले असून त्यांच्यापैकी एकटा टाटा स्टील मास्टर्सच्या इतिहासात प्रथमच जेतेपद पटकावण्याची शक्यता आहे. 11 व्या फेरीनंतर जेतेपदावर नजर ठेवून असलेल्या उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हला अर्जुन एरिगेसीने पराभूत केल्याने त्याची गुणसंख्या 7.5 वर राहून तो जेतेपदाच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे.
प्रज्ञानंद या सामन्यात पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळला. काऊआनाविऊद्धच्या त्याच्या मागील फेरीच्या सामन्यापेक्षा हा खूपच वेगळा ठरला. कारण सरानाने सुऊवातीलाच आक्रमक पवित्रा घेत हल्ला केला. पण प्रज्ञानंद निराश झाला नाही आणि त्याने शेवटी बाजू परतविली. डावपेचांतून गुंतागुंत निर्माण करण्याच्या बाबतीत त्याची बाजू वरचढ राहिली. फोर्स चेकमेटने हा सामना संपला. दुसरीकडे, गुकेशची फॉरेस्टविऊद्ध वाटचाल चढउताराने भरलेली राहिली. 39 व्या चालीनंतर गुकेशसाठी विजय मिळविण्यास अनुकूल स्थिती होती. पण या टप्प्यावर भारतीय खेळाडूने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला मोठे पुनरागमन करण्याची संधी दिली. शेवटी हा सामना बरोबरीत संपला.
अर्जुन एरिगेसीने अखेर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविऊद्ध आपले कौशल्य सिद्ध केले. त्यामुळे अब्दुसत्तोरोव्हची अव्वल स्थान मिळविण्याची महत्त्वाकांक्षा संपुष्टात आली. भारतीय खेळाडू पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळला आणि त्याने कॅपाब्लांका व्हेरिएशन निवडल्याने अब्दुसत्तोरोव्हला सामन्याचे चित्र बदलण्याची फारशी संधी मिळाली नाही. अचूक चाली करून अर्जुनने हा सामना गुंडाळला. इतर सामन्यांमध्ये, लिओन ल्यूक मेंडोन्साने अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाला बरोबरीत रोखले, तर पी. हरिकृष्णने जर्मनीच्या विन्सेंट कीमरसोबत बरोबरी साधली.
शेवटचा सामना रोमांचक ठरू शकतो. कारण गुकेशचा सामना पुन्हा सूर गवसलेल्या अर्जुनशी होईल, तर प्रज्ञानंदला कीमरचा सामना करावा लागेल. दोन्ही सामने बरोबरीत सुटले तर, कमी कालावधीच्या प्ले-ऑफमधून विजेता ठरेल. दरम्यान चॅलेंजर्स विभागात आर. वैशाली तुर्कीच्या एडिझ गुरेलकडून पराभूत झाल्याने पाच गुणांवर राहिली आणि दिव्या देशमुखला हॉलंडच्या बेंजामिन बोकविऊद्ध पराभव पत्करावा लागला. या विभागात अझरबैजानचा आयदिन सुलेमानली आणि चेक प्रजासत्ताकचा न्गुयेन थाई दाई व्हॅम हे एर्विन लामीसोबत प्रत्येकी 8.5 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत.









