पारुनिका सिसोदीया ‘सामनावीर’, इंग्लंडवर 9 गड्यांनी मात, जी. कमलिनीचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
आयसीसीच्या महिलांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय युवा महिला संघाने इंग्लंडचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 5 गड्यांनी मात करत अंतिम फेरी गाठली. आता भारत आणि द. आफ्रिका यांच्यात जेतेपदासाठी रविवारी लढत होईल. भारताच्या पारुनिका सिसोदीयाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
शुक्रवारी पहिल्या उपांत्य सामन्यात भारत युवा महिला संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. मात्र सिसोदीया, वैष्णवी शर्मा तसेच आयुषी शुक्ला यांच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडने 20 षटकात 8 बाद 113 धावा जमवित भारताला विजयासाठी 114 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर त्रिशा गोगांडी आणि कमलिनी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 15 षटकात 1 बाद 117 धावा जमवित हा सामना 30 चेंडू बाकी ठेवून 9 गड्यांनी जिंकत अंतिम फेरी गाठली.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या डेव्हीना पेरीनने 40 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 45 तर कर्णधार नोरग्रोव्हने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30 तर अमू सुरेनकुमारने 13 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 14 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. सिसोदीयाने 21 धावांत 3, वैष्णवी शर्माने 23 धावांत 3 तर आयुषी शुक्लाने 21 धावांत 2 गडी बाद केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी स्वीपचे चुकीचे फटके मारण्याच्या नादात आपल्या विकेटस् गमविल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 6 फलंदाज त्रिफळाचित झाले. 10 षटकाअखेर इंग्लंडची स्थिती 2 बाद 73 अशी होती. पण शेवटच्या 10 षटकात त्यांचे 6 गडी केवळ 40 धावांत बाद झाले. इंग्लंडच्या डावातील शेवटच्या चार षटकामध्ये तळाच्या फलंदाजांनी काही धावा घेतल्याने त्यांना 100 धावांचा टप्पा ओलांडता आला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना त्रिशा गोंगाडी आणि कमलिनी यांनी 9 षटकात 60 धावांची भागिदारी केली. त्रिशाने 29 चेंडूत 5 चौकारांसह 35 धावा जमविल्या. कमलिनी आणि सानिका चाळके यांनी विजयाचे सोपस्कर पूर्ण केले. कमलिनीने 50 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 56 तर सानिका चाळकेने 12 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 11 धावा जमविल्या. भारताला 15 अवांतर धावा मिळाल्या. भारताच्या डावात 14 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 44 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडतर्फे ब्रेट 30 धावांत 1 गडी बाद केला. भारतीय युवा महिला संघच्या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकात 8 बाद 113 (पेरी 45, नोरग्रोव्ह 30, सुरेनकुमार नाबाद 14 अवांतर 2, सिसोदीया 3-21, वैष्णवी शर्मा 3-23, आयुषी शुक्ला 2-21), भारत 15 षटकात 1 बाद 117 (कमलिनी नाबाद 56, त्रिशा गोंगाडी 35, सानिका चाळके नाबाद 11, अवांतर 15, ब्रेट 1-30)
द. आफ्रिका अंतिम फेरीत
दुसऱ्या उपांत्य सामन्यात द. आफ्रिकेच्या कनिष्ठ महिला संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा 11 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात द. आफ्रिकेच्या अॅश्ले व्हॅन वीकला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. तिने 17 धावांत 4 गडी बाद केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 105 धावा जमविल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 18.1 षटकात 5 बाद 106 धावा जमवित विजय नोंदविला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात ब्रेने 44 चेंडूत 3 चौकारांसह 36, ब्रिस्कोने 17 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 27 तर कर्णधार हॅमिल्टनने 16 चेंडूत 3 चौकारांसह 18 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला 8 अवांतर धावा मिळाल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 10 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेच्या अॅश्ले व्हॅन वीकने 17 धावांत 4 तर नीनी, रिनेकी आणि नायडू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावात सलामीच्या जेमा बोथाने 24 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 37, कर्णधार रिनेकीने 26 चेंडूत 3 चौकारांसह 26, मेसोने 29 चेंडूत 2 चौकारांसह 19 तर व्हॅन वूरस्टने 1 चौकारांसह नाबाद 8 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे गिल आणि हॅमिल्टन यांनी प्रत्येकी 2 तर एन्सवर्थने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया 20 षटकात 8 बाद 105 (ब्रे 36, ब्रिस्को नाबाद 27, हॅमिल्टन 18, अवांतर 8, व्हॅन वीक 4-17), द. आफ्रिका 18.1 षटकात 5 बाद 106 (बोथा 37, रिनेकी 26, मेसो 19, गिल व हॅमिल्टन प्रत्येकी 2 बळी)









