केंद्रीय जलशक्ती अभियान नोडल अधिकारी डी. व्ही. स्वामी : जि. पं. कार्यालयात आढावा बैठक
बेळगाव : जलसंवर्धनासाठी जलशक्ती अभियान हा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी डी. व्ही. स्वामी यांनी व्यक्त केली. जि. पं. कार्यालयात गुरुवारी जिल्हास्तरीय जलशक्ती अभियानाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले, पावसाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्याची अडवणूक करण्यासाठी पारंपरिक जलस्त्रोतांचे नूतनीकरण करणे, कूपनलिका खोदणे, पाणलोट आणि सामाजिक वनीकरणाच्या कामांना चालना देणे आदी कामे केली पाहिजेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलशक्ती अभियानाबरोबर पाणलोट क्षेत्राचा विकास करणे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. जलशक्ती अभियानांतर्गत विविध ठिकाणांना भेट देऊन भूजल पातळी तपासणे, बचत गट आणि इतर संस्थांच्या मदतीने जलस्त्रोतांचा विकास करणे अशा सूचनाही त्यांनी केल्या. सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयीन इमारतींवर पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी कामे हाती घ्यावीत, जलसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी कृषी फलोत्पादन आणि सामाजिक वनीकरण विभागानेही परिश्रम घ्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी केंद्रीय भूजल मंडळाचे तज्ञ डॉ. सुचेतना बिस्वास, योजना निर्देशक रवी एन. बंगरप्पण्णवर, कृषी, फलोत्पादन, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग, पंचायतराज यांसह जि. पं. चे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.









