सुरक्षा उपायांची खबरदारी घेण्याचा सल्ला
बेळगाव : बँका, सोसायट्या व मायक्रो फायनान्सपाठोपाठ सराफी व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयात ही बैठक झाली. शहरातील सराफी व्यवसायचालक व त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्येचे प्रकार वाढले आहेत. याबरोबरच सराफी पेढ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही राज्यातील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे.
बुधवारी मायक्रो फायनान्स चालक, बँका व सोसायट्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर सराफी व्यावसायिकांना बोलावून कायद्याच्या चौकटीत कार्य करण्याचे सूचित करण्यात आले. सराफी दुकानांच्या सुरक्षेसंदर्भातही पोलीस अधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना केल्या. प्रत्येकाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, गुन्हे थोपविण्यासाठी व एखाद्या गुन्हेगारी घटनेनंतर गुन्हेगारांच्या शोधासाठी फुटेज कसे अनुकूल ठरतात, याविषयी माहिती देण्यात आली. यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला असता सराफी दुकानांच्या सुरक्षेविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. एखादा आणीबाणीचा प्रसंग ओढवला तर पोलीस दलाशी कसा संपर्क करावा? सुरक्षेची व्यवस्था कशी असावी? आदीविषयी त्यांना माहिती देण्यात आली आहे. अलीकडच्या काही घटनांमुळे त्यांना खबरदारी घेण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले.









