दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठ्याची मागणी : हेस्कॉमचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ
वार्ताहर/किणये
वाघवडे-किणये परिसरात विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्यांना दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठा दिला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात शिवारात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. एखादा मोठा अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण? असाच सवाल शेतकरी वर्ग उपस्थित करू लागले आहेत. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठा दिला जात नाही. यामुळे आता दि 4 फेब्रुवारी रोजी हेस्कॉमच्या मच्छे येथील विभागीय कार्यालयावर थेट मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
वाघवडे, संतिबस्तवाड, बाळगमट्टी, बामणवाडी, कर्ले, किणये ,बहादरवाडी या भागातील शेतकऱ्यांना शिवारात थ्री-फेज विद्युत पुरवठा दिला जात नाही. कधी अर्धा तास तर कधी पंधरा मिनिटे असा अधून मधून विद्युत पुरवठा दिला जात आहे. यामुळे शिवारात भाजीपाला व अन्य पिके घ्यायची कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता थेट शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. या भागात ऊस, फ्लॉवर, कोथिंबीर, लालभाजी, मेथी, शेपू, गाजर, वांगी आदी विविध प्रकारची भाजीपाला पिके घेण्यात येतात.
पिकांना पाणी देणे गरजेचे
या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र शिवारात थ्री फेज विद्युत पुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांना सदर पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे ब्रयाच शेतकऱ्यांची पिके वाळून जात आहेत. याचा फटका बळीराजाला बसत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी दि. 27 रोजी मच्छे येथील विभागीय कार्यालयात थ्री-फेज विद्युत पुरवठा देण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांनी गुऊवारी सकाळी नावगे क्रॉस क्रॉस येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे बैठक घेऊन आता थेट मोर्चा काढण्याचा इशारा निर्णय घेतलेला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोनापा पाटील होते. बैठकीत माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मेघो बिरजे यांचेही भाषण झाले.
मोर्चासंदर्भात आज निवेदन देणार
पुन्हा एकदा दि. 31 रोजी सकाळी हेस्कॉम कार्यालयात मोर्चा संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 4 रोजी थेट मोर्चा काढण्यात येणार आहे. बैठकीला या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









