काजू पिकांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे उत्पादकांमधून समाधान
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-ओलमणी परिसरात काजू झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ झाला असून, जानेवारी महिन्यातच काजू झाडे बहरल्यामुळे उत्पादकांमधून समाधान पसरले आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात काजू उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे शेतकरी वर्गाने ओसाड माळरानावरील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात काजू झाडांची लागवड केली आहे. काजू हे या भागातील प्रमुख नगदी पीक असल्यामुळे यापासून शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. दरवर्षी काजू झाडांना डिसेंबर महिन्यापासून मोहर येण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होतो. यासाठी निरभ्र आकाश व उष्ण वातावरणाची आवश्यकता असते. यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेला पाउस तसेच थंडीची तीव्रता देखील कमी असल्यामुळे काजू पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जानेवारीमध्ये बागा मोहरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जानेवारी महिन्यात काजूला मोहर आल्यानंतर दरवर्षी मार्च महिन्यापासून काजू उत्पादनाला प्रारंभ होतो. शेतकरी वर्ग काजू झाडांचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी व काजू बिया गोळा करण्यास अनुकूल व्हावे या उद्देशाने जानेवारी महिन्यापासूनच काजू बागांच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात करतात.
तुरळक ठिकाणी फळधारणेला प्रारंभ
यावर्षी काजू झाडांना डिसेंबर महिन्यातच मोहर येण्यास प्रारंभ झाला आहे. तसेच काजू पिकांच्या फळ धारणेसाठी पोषक वातावरण असल्यामुळे सध्या या परिसरात संकरित जातीच्या काजू झाडांना फळधारणेला प्रारंभ झाला आहे. यामुळे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत प्रत्यक्षात काजू उत्पादनाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी पडणारे धुके तसेच दव व ढगाळ वातावरणामुळे काजू मोहर व नुकतीच फळधारणा होत असलेल्या काजू पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्गांना बागायती खात्याने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.









