पाच संशयितांना अटक : हत्या झालेला सलवान मोमिका हा इराकी नागरिक
वृत्तसंस्था/स्टॉकहोम
अनेकदा कुराण जाळणारा माजी मुस्लीम इराकी सलवान मोमिका याची स्वीडनमध्ये मुस्लीम दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वीडनच्या प्रशासनाने पाच संशयितांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी घडली होती. मोमिका हा स्वीडनमध्ये आश्रय घेतलेला इराकी नागरिक होता. त्याने काही वर्षांपूर्वीच इस्लाम धर्म आणि इस्लामी जीवनपद्धती यांच्या त्याग केला होता. तो स्वत:ला इस्लामविरोधी मानत होता. त्याच्यावर कुराण जाळण्याप्रकरणी स्वीडनच्या न्यायालयात अभियोगही सादर करण्यात आला होता. या अभियोगावर लवकरच निर्णय होणार होता. पण त्याआधीच त्याची हत्या करण्यात आली.
या अभियोगाचा मंगळवारी निर्णय होणार होता. तथापि, हा न्यायालयाने आपला निर्णय घोषित करण्यापूर्वीच त्याची कट्टरतावादी लोकांकडून हत्या करण्यात आली. सोदरताजे या उपनगरातील त्याच्या घरात त्याची हत्या करण्यात आली. 2023 मध्s त्याने स्वीडनमध्ये जाहीररित्या कुराणाची प्रती जाळली होती. त्याने सोशल मिडियावरुनही हे कृत्य अनेकदा केले होते, असे बोलले जात आहे. त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सहकाऱ्यालाही धोका
याच कारणासाठी त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येत होती. त्याच्या इस्लाम विरोधात त्याला अन्य एका व्यक्तीचे सहकार्य होते. या व्यक्तीविरोधातही न्यायालयात अभियोग चालविण्यात येत होता. या व्यक्तीने मोमिका याची हत्या झाल्यानंतर ‘एक्स’वर एक पोस्ट टाकून ‘आता पुढचा क्रमांक माझा’ असा संदेश प्रसारित केला आहे. स्वीडनचे प्रशासन या प्रकरणाची चौकशी करीत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या सहकाऱ्याचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
सातत्याने धमक्या
सलवान मोमिका याला त्याच्या इस्लामविरोधी आणि कुराणविरोधी भूमिकेमुळे जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने येत होत्या. तथापि, त्याने आपली भूमिका कायम ठेवली होती. इस्लाम आणि कुराण यांना आपण तात्विक भूमिकेवरुन विरोध करीत आहोत, असे त्याचे म्हणणे होते. त्याने स्वीडन प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली नव्हती, अशीही माहिती प्रशासनाने मंगळवारी दिली होती. या हत्येचा निषेध त्याच्या विचारांच्या अनेकांकडून सोशल मिडियावर करण्यात येत आहे.









