रविवारी 60 भाविक गेले होते पुण्यस्नानासाठी
बेळगाव : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात पुण्यस्नानासाठी गेलेल्या बेळगाव येथील दोघा मायलेकींसह चार भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेची खातरजमा केली आहे. सर्व चार भाविकांचे मृतदेह प्रयागराजहून बेळगावकडे निघाले आहेत. या घटनेने महाकुंभमेळ्यात भाग घेण्यासाठी गेलेल्या भाविकांना मोठा धक्का बसला आहे. अरुण नारायण कोपर्डे (वय 61) रा. शेट्टी गल्ली, महादेवी हणमंत बावनूर (वय 48) रा. शिवाजीनगर, मेघा दीपक हत्तरवाट (वय 24) व तिची आई ज्योती दीपक हत्तरवाट (वय 44) दोघीही राहणार वडगाव अशी त्यांची नावे आहेत. आणखी काही भाविक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
बुधवारी सकाळी आलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीत हे सर्वजण जखमी झाल्याचे कळविण्यात आले होते. दुपारनंतर त्यांचे निधन झाल्याची बातमी बेळगावात येऊन थडकली. खासदार जगदीश शेट्टर, माजी आमदार अनिल बेनके, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी मृतांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे प्रयागराज प्रशासनाशी संपर्कात आहेत. बेळगाव येथील भाविकांची अवस्था काय आहे? ते सर्व जण सुखरुप आहेत की अडचणीत आहेत? आदी माहिती मिळवण्यात येत होती. राज्य सरकारनेही उत्तर प्रदेश प्रशासनाबरोबर संपर्क ठेवला आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी सायंकाळी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चारही भाविकांची नावे जाहीर केली आहेत.
आयपीएस अधिकारी श्रुती एन. एस. व केएएस अधिकारी हर्ष शेट्टी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह बेळगावला पोहोचविण्याबरोबर प्रयागराजमध्ये संकटात सापडलेल्यांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांकही जाहीर केले आहेत. सावगाव येथील साईरथ ट्रॅव्हल्सच्या दोन खासगी बसमधून बेळगाव येथील 60 भाविक प्रयागराजला गेले होते. 26 जानेवारी रोजी या बसेस बेळगावमधून सुटल्या होत्या. मौनी अमावस्येनिमित्त मंगळवारी रात्रीपासूनच प्रयागराजमध्ये पुण्यस्नानासाठी प्रचंड गर्दी होती. बेळगावमधून गेलेले भाविकही पुण्यस्नानासाठी निघाले होते. त्यावेळी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झाला आहे.
पालकमंत्र्यांकडून शोक व्यक्त…
चेंगराचेंगरीत बेळगाव येथील भाविकांचा मृत्यू झाला आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दुखवटा व्यक्त केला आहे. यासंबंधी पालकमंत्र्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. चेंगराचेंगरीत काही जण जखमी असल्याची माहिती आहे. ते सुखरूप घरी परततील, अशी असे त्यांनी सांगितले.
चारही मृतदेह आज बेळगावात आणणार
चारही भाविकांचे मृतदेह बुधवारी सायंकाळी प्रयागराजमधून बेळगावला पाठवण्यात आले आहेत. दिल्लीपर्यंत रुग्णवाहिकेतून आणण्यात येणार आहेत. तेथून विमानाने बेळगावला आणण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. गुरुवारी सायंकाळपर्यंत हे मृतदेह बेळगावला पोहोचणार आहेत.
मोबाईल हरवल्यामुळे कुटुंबीयांशी संपर्क साधणे झाले अवघड
चेंगराचेंगरीनंतर बेळगावच्या भाविकांचे मोबाईल, बॅग हरवली आहे. त्यामुळे कुटुंबीयांशी संपर्क साधणेही त्यांना कठीण गेले. 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभमेळ्यासाठी बेळगावमधूनही मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराजला गेले आहेत. या घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क साधून ते सुखरूप आहेत की नाही, याची खात्री करून घेत आहेत.
जखमींना आणण्यासाठी अधिकारी नियुक्त
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या राज्यातील भाविकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रयागराजमध्ये अडकून पडलेल्या भाविकांचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऐकून दु:ख झाले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत आहे.
– सिद्धरामय्या, मुख्यमंत्री









