पोलीस आयुक्तांची मायक्रो फायनान्स चालकांना सूचना
बेळगाव : बिदर व मंगळूर दरोड्यानंतर बँका, सोसायटी व सराफी पेढ्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी बँका व सोसायटींच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षेसंबंधी सूचना करण्यात आली. याबरोबरच मायक्रो फायनान्स चालकांना कर्ज वसुलीसाठी दमदाटी करू नये, असे सूचित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे उपायुक्त निरंजनराज अरस आदी अधिकाऱ्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. खास करून सुरक्षेबरोबरच मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रमुख, व्यवस्थापक यांना सरकारने दिलेल्या सूचना कळविण्यात आल्या. बेळगावसह संपूर्ण राज्यात मायक्रो फायनान्स चालकाकडून कर्जवसुलीसाठी दादागिरी सुरू आहे. याला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केली आहे. कर्जदारांकडून भरमसाठ व्याज आकारणी करू नये, कर्जवसुलीसाठी दमदाटी करू नये, अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. बँका व सोसायटींच्या सुरक्षिततेसाठी उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचेही अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.









