रहिवाशांची अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : श्रीनगर, वंटमुरी कॉलनी सेक्टर नं. 5 मधील जनता प्लॉटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पूर्वीप्रमाणे मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे. जय भीम गर्जना युवक युवा शक्ती मंडळाच्या नेतृत्वात रहिवाशांनी बुधवारी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदारांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. वंटमुरी कॉलनी सेक्टर नं. 5 मधील जनता प्लॉटमध्ये मागील 25 ते 30 वर्षांपासून अनुसूचित जाती प्रवर्ग कल्याण योजनेंतर्गत घरे वाटप करण्यात आली आहेत. या घरांमध्ये पुटुंबे वास्तव्यास असून प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मोफत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र मागील महिन्यापासून 24 तास पाणी योजनेसाठी जलवाहिनी जोडण्याचे काम या भागात सुरू आहे.
काही कर्मचारी जनता प्लॉटमधील घरांना भेटी देऊन आधारकार्ड, मालमत्ता कर भरणा केल्याची पावती, 100 रुपयांचा बाँडपेपर तसेच पाणीपट्टी भरल्याची पावती महानगरपालिकेत सादर करावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, अशी सूचना करीत आहेत. जनता प्लॉटमधील राहणारी कुटुंबे गरीब आणि सफाई काम करून गुजराण करीत आहेत. त्यामुळे त्यांना पाणीपट्टी भरणे शक्य होणार नाही. पूर्वी मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता 24 तास पाणी देण्याचे निमित्त करून पाणी बिल वसूल करण्यात येत आहे, अशी तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे. वंटमुरी कॉलनीतील आंबेडकर भवनामध्ये स्वच्छतागृह व स्नानगृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे गैरसोय होत आहे. आंबेडकर भवनामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना निवेदन देताना विजय निरगट्टी, दीपक वाघेला, विजय कांबळे, संजय कांबळे, ज्योती घटकांबळे, भरत मेत्री, राजण्णा कांबळे, नंदा कांबळे, सुरेखा कांबळे आदी उपस्थित होते.









