कोल्हापूर :
नवीन शैक्षणिक धोरण -2020 नुसार इयत्ता 3 री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस मूलभूत वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास सर्वोच्य प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट सन 2026-27 पर्यंत साध्य करण्याच्या निर्धाराने भारत सरकारने निपुण भारत अभियानाची सुरूवात केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्यामध्ये हे अभियान प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टीने ‘मिशन अंकुर–आरंभिक साक्षरता संवर्धनाचा कार्यक्रम’ हा नवोपक्रम राबविण्यात येत आहे. या नवोपक्रमाद्वारे मुलांच्या आरंभिक साक्षरतेचे मुल्यमापन होऊन वर्गाच्या रॅकींग पध्दतीमुळे शिक्षकांच्या अध्यापनाचे ही मुल्यमापन होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.
शिक्षणाधिकारी डॉ. शेंडकर म्हणाल्या, नवीन शैक्षणिक धोरणानुसार व निपुण भारत अभियानांतर्गत 100 टक्के विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्ती’ हे निर्धारित उद्दिष्ट साध्य करणे, इयत्ता 1 ली व 2 री च्या वर्गनिहाय निश्चित केलेल्या सर्व अध्ययन निष्पती प्राप्त होण्यासाठी आवश्यक मूल्यमापन प्रणाली विकसित करणे, शिक्षकांच्यामध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन त्याचा उपयोग विद्यार्थी गुणवत्ता वाढीची उच्चत्तम पातळी गाठण्यासाठी करणे, अप्रगत विद्यार्थी संख्या प्रमाण कमी होऊन प्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया राबविणे, शिक्षकांच्यामध्ये वर्गाच्या गुणवत्तेप्रती जबाबदारी व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे आदी प्रमुख उद्दीष्टे आहेत.
या धोरणानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्यामधील इयत्ता 1 ली व 2 री च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एप्रिल 2024 मध्ये अभ्यासक्रमावर आधारित 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सदरची परीक्षा केंद्रस्तरावर होईल. केंद्र बदलून पर्यवेक्षक, परीक्षक व केंद्रसंचालक यांची नेमणूक केली जाईल. परीक्षा कामकाजादिवशीच निकाल तयार केला जाईल. मुलामध्ये गुणांची स्पर्धा निर्माण न होता शिक्षकांच्यामध्ये पूर्ण वर्गाच्या गुणवत्तेची स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी श्रेणी आधारित मूल्यमापन प्रक्रिया राबविली जाईल. विद्यार्थ्यांमधील गुणांची स्पर्धा संपावी, मुलांनी फ्ल्युअन्सी इन लैंगवेज अॅन्ड न्युमरसी व निपुण भारतची उद्दिष्टे प्राप्त करावीत यासाठी परीक्षेची मूल्यमापनाची प्रक्रिया बदलली आहे. ज्यामध्ये मुलांना गुणांऐवजी श्रेणी देण्यात येईल. याशिवाय सर्व मुलांच्या गुणांच्या बेरजेला पटसंख्येने भागून सरासरी गुण ठरविण्यात येतील. वर्गातील अधिक पटसंख्येनुसार बोनस गुण देऊन समतोल साधण्यात येईल. यात वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला महत्व दिल्याने सर्वच्च विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. वर्गाच्या सरासरी गुणांच्या आधारे संबंधित वर्गाची रँक ठरणार असून, आपल्या वर्गाची व शाळेची रँक उत्कृष्ट ठरण्यासाठी वर्गशिक्षकांना सर्वच विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घ्यावी लागणार आहे. परिणामी काही ठराविक विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याकडे असणारा कल या नव्या मूल्यमापन पद्धतीमुळे बदलावा लागणार असल्याचे डॉ. शेंडकर यांनी नमूद केले.
अक्षरे, अंक, चिन्हे व आकार हे मुलांच्या खेळाचा भाग बनतील अशी प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये मुलांच्या भावविश्वाशी जोडली जाणारी चित्रे असतील. वाक्यनिर्मिती आणि लेखन कौशल्यात पारंगतता येण्यासाठी अधिकाधिक शब्दसंपत्ती हाताळण्याची संधी असेल. छापील मजकुराचे आकलन व विश्लेषण करून चित्र निरीक्षणातून वर्णनात्मक कौशल्याचा विकास होण्याची संधी असेल. तर्कशुद्ध विचारांना चालना देतील अशा गणितीय क्रिया असतील. परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांना शिक्षण विभागातर्फे गौरविण्यात येणार आहे. अशाप्रकारे 6 ते 9 वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक विविध अंगाचा विकास, या उपक्रमाद्वारे करण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या या नवोपक्रमामध्ये प्राथमिक शिक्षक व सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने मनापासून सहभाग घेतल्यास मुलांच्या साक्षरतेचा वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही. हा उपक्रम म्हणजे आरंभिक साक्षरतेसाठी दर्जेदार अध्ययन–अध्यापनाची प्रक्रिया राबविली जावी, यासाठी जाणीवपूर्वक तशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. शेंडकर यांनी सांगितले.








