कोल्हापूर :
कळंबा तलावाच्या वाढत्या प्रदूषणाकडे लक्ष देण्यास जिल्हा प्रशासनास अजिबात वेळ नाही. जिल्हाधिकारी, महापालिका, जिल्हा परिषद, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागांचे तलावाच्या पाणी प्रदूषणाकडे निवेदनाच्या माध्यामातून ग्रामस्थांनी वेळोवेळी लक्ष वेधले. पण या सर्व विभागांनी तलावाच्या पाणी प्रदूषणाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. कळंबा गावासह शहरातील सुमारे 30 हजारहून अधिक नागरिक कळंबा तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. प्रदूषित पाण्यामुळे जीबीएस रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागचे म्हणणे आहे. त्यामुळे कळंबा तलावातील जलसाठा शुद्ध राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता तरी पाऊले उचलणार का? असा सवाल कळंबा ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात हॉटेल, सांस्कृतिक कार्यलये, फार्म हाऊस, शेती पर्यटन केंद्र, नागरीवस्ती, प्लॉटींग प्रोजेक्ट यांची संख्या वाढत आहे. या सर्व घटकांच्या माध्यमातून निर्माण होणारे सांडपाणी थेट तलावामध्ये मिसळणारे ओढे, नाल्यांमध्ये सोडले जात आहे. ओढे, नाल्यांच्या माध्यमातून हे सांडपाणी तलावामध्ये मिसळत आहे. परिणामी तलावाचे पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी तलावामधील मासे ही मृत झाले. तलावाचे पाणी प्रदूषण सुरु असून याकडे वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही ढिम्म प्रशासन येथील प्रदूषण रोखण्यासाठी पाऊले उचलताना दिसत नाही.
- प्रदूषित पाण्यामुळे जीबीएस रुग्णसंख्येत वाढ
जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कॅबिनेट मंत्री मंडळाची बैठक झाली. यामध्ये आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रदूषित पाण्यामुळे जीबीएस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत प्रदूषित होऊ नये, यासाठी नियमावली तयार करणार असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
- नियमावली केवळ कागदावरच
जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली करणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. पण त्या नियमावलींची प्रशासनाकडून प्रामाणिक अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. सध्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्राधिकरणाकडून प्लॉटींग प्रोजेक्ट, बांधकामांना परवानगी दिली जात आहे. हि परवानगी देतानाही तलावाचे पाणी प्रदूषित होणार नाही यासाठी नियमावली आहे. पण प्रत्यक्षात हि नियमावली केवळ कागदावरच राहिली आहे.
- नागरीवस्ती, हॉटेल, हॉल प्रदूषणास कारणीभूत
पाणलोट क्षेत्रात प्राधिकरण परवानगी देत असले तरी येथे बांधकाम करण्यासाठी कळंबा ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. येथील नागरीवस्ती, हॉटेल, सांस्कृतिक हॉल, कृषी पर्यटन केंद्र तलावाच्या पाणी प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. या घटकांना ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे कळंबा ग्रामपंचायतीकडून सांगितले जात आहे. मग कोणाऱ्या वरदहस्ताने येथे बांधकामे झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- रंकाळ तलावाकडे लक्ष, कळंब्याकडे दुर्लक्ष
रंकाळ तलावाचे पाणी प्रदूषित होऊनही येथील पाणी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासनाकडून लक्ष दिले जात आहे. मात्र शुद्ध जलसाठा असलेल्या कळंबा तलावाच्या पाणी प्रदूषणाकडे मात्र महापालिका, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रंकाळा तलावामध्ये म्हैशी धुणाऱ्यांवर दहा हजाराचा दंड करण्याचा आदेश दिला. शुद्ध जलस्त्रोत असलेल्या कळंबा तलावात राजरोसपणे म्हैशी सोडल्या जात आहेत. तसेच अन्य घटकांच्या माध्यमातूनही पाणी प्रदूषित होत आहे. सद्यस्थितीत प्रशानाने उपाययोजना केल्यास तलावाचे प्रदूषण रोखणे शक्य आहे. त्यामुळे कळंबा तलावाचा रंकाळा होऊ नये यसाठी जिल्हाधिकारी यांनी कळंबा तलावाच्या प्रदूषणाकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
- जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे
कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील बांधकामांना कळंबा ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. तलावाच्या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यास ग्रामपंचायतीला मर्यादा येत आहेत. त्यामुळे कळंबा तलावाचे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
विकास पोवार–बावडेकर, ग्रा.पं. सदस्य, कळंबा








