कोल्हापूर :
पुण्यात मागील महिन्यापासून गिलेन–बारे सिंड्रोम (जीबीएस) आजाराने थैमान घातले आहे. पुण्यात दिवसेंदिवस याचे रूग्ण वाढत असताना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रूग्णालयामध्ये (सीपीआर) गेल्या वर्षभरात गिलेन बारे सिंड्रोम (जीबीएस)च्या 24 रूग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
सीपीआरमध्ये यातील गंभीर रूग्णांना आजारातून बाहेर काढले आहे. सर्व रूग्ण बरे झाले असुन त्यांची तब्येत अगदी ठणठणीत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. त्यामुळे हा आजार कोल्हापुरसाठी काही नवा नाही, असेच म्हणावे लागेल.
जीबेएस आजाराबाबत कोल्हापुरात उलटसुलट चर्चा सुरू असुन काहींकडून गैरसमजही पसरविण्यात येत आहेत. पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरातही जीबीएसचा शिरकाव झाला असला तरी यापुर्वी सीपीआरमध्ये अशा आजारातील रूग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. खासगी रूग्णालयात याचा खर्च लाखोंच्या घरात आहे. याची औषधे महागडी असली तरी सीपीआरमध्ये सर्व उपचार मोफत होत आहेत. गेल्या वर्षभरात सीपीआरमध्ये जीबीएसच्या एकूण 24 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात जीबेएसच्या विविध व्यांधींशी निगडित रूग्ण दाखल झाले होते. बहुतांशी रुग्णांमध्ये हाता पायाला मुंग्या येणे, पाय लूळे पडणे त्यानंतर पोटाचे, श्वसनाचे, हातांचे व गिळण्याशी संबंधित स्नायू कमकुवत होणे अशा लक्षणांचे रूग्ण दाखल झाले होते. डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांना जीबेएस झाल्याचे समोर आले होते. तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचारावेळी काहीवेळा रक्तदाब कमी–जास्त होणे, किंवा हृदय बंद पडणे अशा गंभीर स्थितीतून व्हेंटेलेटरमधून बाहेर काढण्यात यश आले आहे.
‘नर्व कंडक्शन स्टडी’ तपासणी केल्यानंतर त्याच्या निदानाची निश्चिती होते. या आजाराच्या उपचारासाठी ‘प्लाझ्मा फेरीसिस’ म्हणजे रक्ताच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया व ‘इमिनोग्लोबलिन’ या महागड्या औषधाची उपचार पद्धतीचा आवलंब करण्यात आला. दोन्ही उपचारांना रूग्णांनी चांगला प्रतिसाद दिला. उपचारामध्ये या दोन्ही पद्धती उपयुक्त ठरल्या. अशा प्रकारच्या आजाराचे रुग्ण अधून मधून कमी प्रमाणातच आढळतात. लवकर निदान झाल्यानंतर त्याला योग्य उपचार मिळाल्यानंतर पुर्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- गेल्या वर्षभरात 24 रूग्ण बरे
सीपीआरमध्ये गेल्या वर्षभरात जीबेएस आजाराचे 24 रुग्ण दाखल झालेले होते. सर्व रुग्णांना इम्मुनो ग्लोबिन किंवा प्लास्माफेरेसिस या उपचार पद्धती नंतर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज करण्यात आले. गेल्या वर्षभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. काही रुग्णांना काही कालावधीकरिता व्हेंटिलेटर ची गरज लागली होती. औषधोपचारासह विविध थेरपीच्या उपचारानंतर रूग्णांच्या तब्येतमध्ये चांगली सुधारणा झालेली आहे.
डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधिक्षक, सीपीआर
- गंभीर रूग्णांवर यशस्वी उपचार
जीबीएस आजाराचे चार प्रकार आहेत. पहिल्या स्टेप मध्ये रूग्ण लगेच बरा होतो. मात्र पुढील स्टेपमध्ये रिकव्हर होण्यास थोडा उशिर लागतो. सीपीआरमध्ये गेल्या वर्षात रूग्णांना गंभीर स्थितीतुन बाहेर काढले आहे. औषधे उपलब्ध असल्याने गेल्या जीबेएस आजारातील रूग्णांना सीपीआरमध्ये बाहेर काढण्यात आले आहे.
डॉ. अनिता परितेकर, औषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, सीपीआर








