कोल्हापूर :
शहरात वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. वाढती वाहनसंख्या आणि वाहतूक नियोजन याप्रश्नावर उपाय शोधण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचे वास्तव आहे. सिग्नल, क्रेन यापलिकडे जाऊन वाहतूक शिस्त आणि कोंडीवर उपायोजना यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा दोन्ही कमी पडत आहे. यंत्रणेचे अपुरे ज्ञान, गायब झालेली पार्किंग व्यवस्था, भाविकांची गर्दी, अशा अनेक कारणांनी शहर वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरातील वाहतुकी व्यवस्था सुधारणार कधी? शिस्त कधी लागणार? हे प्रश्न मात्र यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अनुत्तरीतच आहेत.
शहरातील सिग्नल व्यवस्था सांभाळणे हेच पोलीस आणि महापालिका यंत्रणेचे काम दिसत आहे. यंत्रणेतील त्रुटींमुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढ होत असल्याचे वास्तव असूनही यावर उपाय योजना होताना दिसत नाही. पोलिसांची क्रेन सोमवार–मंगळवार आणि बुधवारी ठराविक गर्दीच्या मार्गावरुन दर अर्ध्यातासाला फेरी मारुन गाड्या उचलण्याचे काम करते. शहरातील सुरू असलेले सिग्नल हेच काय नजरेत भरणारे यंत्रणेचे काम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अर्धातास सिग्नल बंद पडला तरी यंत्रणेची तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. शेवटी महापालिका, पोलीस आणि वाहनधारक यांच्या संयुक्त सहकार्यानेच शहरातील वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होणार आहे.
- ठोस उपाय कधी ?
वाहतूक शिस्त लावण्याच्या नावाखाली शहरातून क्रेन फिरत असते. मात्र त्याच त्या ठरलेल्या रस्त्यावर क्रेनचा वावर दिसतो. क्रेन वाहने उचलत असताना मध्येच रस्त्यावर थांबवली जाते. त्यानंतर त्या रस्त्यावर दहा मिनिटे वाहनांची कोंडी होते. रस्त्याकडेला असणाऱ्या अवैध टपऱ्यांनी ग्राहकांना ये–जा करता यावी, यासाठी पार्किंगची जागा अडिविली आहे. प्रमुख रस्त्यावरील पार्किंग खुले करण्याची गरज आहे.
- वाहनधारकांचीही जबादारी
सिग्नलवर डाव्या बाजूला वाहनांसाठी रस्ता रिकामा ठेवणे
वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे
वाहतुकीला अडचण होणार नाही, असे पार्किंग करणे
सूचना आणि कायद्याचे पालन करणे








