सरकारतर्फे आरोप सिद्ध करता न आल्याने द्वितीय जेएमएफसी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ खटल्यात सरकार पक्षातर्फे संशयितांवर आरोप सिद्ध करता न आल्याने सर्व 26 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मंगळवार द्वितीय जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश पंकजा होन्नूर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नामदेव विठ्ठल कदम, नागराज दौलत कुगजी, हणमंत लुमाण्णा कुगजी, राजीव जोतिबा नायकोजी, आनंद यल्लाप्पा मुचंडी, मारुती महादेव अष्टेकर, जयसिंग यल्लाप्पा अष्टेकर, दीपक बाबुराव खादरवाडकर, पवन गजानन पोटे, उत्तम तुकाराम धामणेकर, जयवंत गंगाराम टक्केकर, सुनील गुरुराज मुतगेकर, सदानंद यल्लाप्पा पोटे, प्रशांत शंकर टक्केकर, परशराम यल्लाप्पा धामणेकर, राजू विठ्ठल मासेकर, पुंडलिक विष्णू जाधव, परशराम गणपती जाधव, बाळू शंकर धामणेकर, रजत परशराम संभाजीचे, कपिल मल्लाप्पा भोवी, बसवराज शिवप्पा कलमठ, विकास विलास नंदी, परशराम यल्लाप्पा नंदी, विलास मोनाप्पा नंदी, अतुल नारायण मुचंडी अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
येळळ्tर गावच्या वेशीवर उभारण्यात आलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक 26 जुलै 2014 रोजी पोलीस बळाचा वापर करून कर्नाटक सरकारने हटविला होता. त्यावेळी 2000 ते 2500 जणांनी हातात दगड, विटा, लाठ्याकाठ्या घेण्यासह येळ्ळूरहून वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर खांब आणि झाडे आडवी टाकून अडथळा निर्माण करण्यासह शांतता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
याप्रकरणी सतीश बसप्पा गुळदवर रा. मच्छे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी एकूण 30 जणांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणातील सुधीर परशराम धामणेकर, हणमंत फकिरा धामणेकर, सूरज यल्लाप्पा घाडी या तिघांना वगळण्यात आले होते. तर मनोहर यल्लाप्पा मजुकर यांचे निधन झाल्याने वरील 26 जणांवर हा खटला सुरू होता. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटविल्यानंतर आगडोंब उसळला होता. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळे 7 गुन्हे ग्रामस्थांवर दाखल केले होते. त्यापैकी गुन्हा क्र. 167 या खटल्यातून यापूर्वीच कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यानंतर मंगळवारच्या गुन्हा क्र. 166 मधून 26 जणांची निर्दोष मुक्तता झाली. अद्याप 5 खटल्यांची सुनावणी सुरू असून या खटल्यांच्या सुनावणीकडे सीमावासियांच्या नजरा लागून आहेत. गुन्हा क्र. 166 या खटल्यात सरकार पक्षातर्फे संशयितांवर आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने 26 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर खोटेनाटे गुन्हे दाखल करणाऱ्या कर्नाटक सरकारला या निकालाच्या माध्यमातून सणसणीत चपराक बसली आहे. संशयितांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. शाम पाटील यांनी काम पाहिले.









