सांडपाणी मिसळत असल्याने मृत्यूची शक्यता
बेळगाव : बेळगावच्या किल्ला तलावातील मासे मागील दोन दिवसांपासून मृतावस्थेत सापडले आहेत. मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र दिसत आहे. किल्ला तलावात अनेक ठिकाणी सांडपाणी सोडले जात असल्याची तक्रार मागील अनेक वर्षांपासून होत असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावातील पाणी खराब होत असल्याने याचा परिणाम जलचरांवर झाला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या किल्ला तलावाचे पाणी उपयोगामध्ये आणले जात नसले तरी पर्यटनासाठी वापर करण्यात येतो. आजूबाजूच्या परिसरातील गटारी, तसेच सांडपाणी किल्ला तलावात सोडण्यात आले आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा तलावातील पाण्याचा रंगही बदललेला दिसून आला. तसेच पाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे तलावामध्ये सांडपाणी मिसळणार नाही याची खबरदारी महापालिकेने घ्यावी, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली होती.
सोमवारपासून किल्ला तलावाच्या काठानजीक मृतावस्थेतील मासे दिसून आले आहेत. पाणी दूषित झाल्यामुळेच माशांचा मृत्यू होत आहे. अनेक मृत मासे तरंगताना दिसत असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा तलावातील सर्वच मासे टप्प्याटप्प्याने मृत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सांडपाणी मिसळणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.









