नवीन कनेक्शनसाठी 10 हजार रुपये आकारणी होणार, घरोघरी नळ
बेळगाव : एलअॅण्डटी कंपनीने 2026 पर्यंत शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आरसीनगर, मुत्यानट्टी, कणबर्गी येथील 24 तास पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता शहरातील 24 तास पाणीपुरवठ्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. चव्हाट गल्ली, कंग्राळ गल्ली यासह इतर ठिकाणी खोदाई सुरू झाली आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून 24 तास पाण्यासाठी शहरात 9 ठिकाणी जलकुंभ उभारले जात आहेत. यापैकी 6 जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. कंपनीने एकूण 58 पैकी 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण केले आहे.
उर्वरित 48 प्रभागांमध्ये झोन निर्माण केले आहेत. टप्प्याटप्प्याने या झोनमध्ये जलवाहिनी आणि नळजोडणीची कामे हाती घेतली जात आहेत. घरगुती नळजोडणीसाठी अडीच हजार रुपये व रोडकटिंग आणि प्लम्बिंग चार्ज सोसावा लागणार आहे. तर नवीन नळ कनेक्शनसाठी 10 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर संबंधित कागदपत्रांची पूर्तताही करावी लागणार आहे. सद्यस्थितीत शहरातील 14 हजार नळांना 24 तास पाणीपुरवठा केला जातो. सर्वच नळांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलवाहिनी आणि नळजोडणीची कामे सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी काँक्रीटचे रस्ते, तक्रारी आणि इतर कारणांमुळे कामात अडचणी येऊ लागल्या आहेत. मात्र कंपनीने 2026 पर्यंत संपूर्ण शहराला 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.









