विद्याप्रसारक मंडळाच्या गजाननराव भातकांडे स्कूलचा 55 वा वर्धापन दिन उत्साहात
बेळगाव : सुरेल आवाजाची मराठीतील आघाडीची गायिका बेला शेंडे यांच्या जादुई आवाजाची मोहिनी बेळगावच्या रसिकांनी अनुभवली. त्यांनी गायिलेल्या ‘अप्सरा आली’ या नटरंगमधील गीताला तुफान प्रतिसाद मिळाला. मोबाईल टॉर्च लावून या गाण्याचा आनंद बेळगावकरांनी अनुभवला. विद्याप्रसारक मंडळाच्या गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम शाळेचा 55 वा वर्धापन दिन बेला शेंडे यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
वर्धापनदिनानिमित्त सुरुवातीला कॅम्पमधून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेनंतर छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात भव्य कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच बेला शेंडे यांच्या अप्रतिम गाण्यांचा आस्वाद बेळगावच्या रसिकांना घेता आला. त्यांना निवेदक विनायक बांदेकर यांची साथ मिळाली.
उपस्थितांचे स्वागत करताना गजाननराव भातकांडे स्कूलचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे म्हणाले, 1970 मध्ये विद्याप्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या काळी कॉन्व्हेंट शाळांचे वर्चस्व असताना मराठी माणसाने इंग्रजी माध्यम शाळा सुरू केली. सुरुवातीला गजाननराव भातकांडे यांनी सायकलवरून फिरून विद्यार्थी जमविले. या शिक्षण संस्थेचे अनेक विद्यार्थी देश-परदेशात उच्चपदांवर कार्यरत आहेत. चांगले शिक्षक मिळाल्यामुळे शाळेची अल्पावधीतच प्रगती झाली. भविष्यातही दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
शिवाजी उद्यान परिसरात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. त्यानंतर झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट उलगडणारे नृत्य सर्वांमध्ये जोश भरून गेले. शेवटी वाघाचे नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. शाळेमध्ये अनेक वर्षे सेवा बजावलेल्या माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. माजी प्राचार्य दया शहापूरकर, सुवर्णा खन्नूकर व नागेश भातकांडे या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दिमाखात शोभायात्रा…
विद्याप्रसारक शिक्षण मंडळाच्या भातकांडे स्कूलला 55 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशा, ध्वजपथक तसेच पालखी व घोडे अशा दिमाखदार वातावरणात शोभायात्रा सुरू झाली. शोभायात्रेचे उद्घाटन भाजप नेते किरण जाधव, मिलिंद भातकांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी पूजनाने झाले. कॅम्प येथील आयनॉक्स थिएटरपासून शनि मंदिरमार्गे शोभा यात्रा शिवाजी उद्यान परिसरात आली. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, पालक तसे माजी विद्यार्थी या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.









