हत्तींकडून उस शेतीचे नुकसान : शेतकऱ्यांना दिलासा
बेळगाव : धामणे (एस), बैलूर परिसरातील नुकसानग्रस्त उस शेतीचा वनखात्याकडून पंचनामा करण्यात आला आहे. शिवाय भरपाईसाठी पाठपुरावा करण्यात आला, अशी माहिती वनखात्याने दिली आहे. धामणे (एस) आणि बैलूर परिसरातील ऊस शेतीचे हत्तींच्या कळपाकडून नुकसान करण्यात आले होते. रामा जानू वाडेकर, शट्टूप्पा यमेटकर यांच्या उसाचे हत्तीने नुकसान केले आहे. सदर नुकसानग्रस्त शेती क्षेत्राचे एसीएफ नागराज बाळेहोसूर यांच्या नेतृत्वाखाली बीट फॉरेस्टर जयलसिंग रजपूत व राहुल बोंगाळे यांनी पंचनामा केला आहे. शिवाय नुकसानभरपाईसाठी ई पीक पाहणी अॅपवर ऑनलाईन अर्ज केला आहे. धामणे (एस) आणि बैलूर परिसरात दरवर्षी हत्तींकडून पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. अलिकडे डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात वन्यप्राण्यांचा नाहक त्रास सुरू झाला आहे. विशेषत: पाऊस कमी झाल्यानंतर ऊस, भात आणि इतर पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. नुकसानग्रस्त शेतीची वनखात्याकडून दखल घेण्यात आली असून पंचनामा करण्यात आला आहे. शिवाय नुकसानभरपाई देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.









