पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली कानउघाडणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातून कच्चा माल निर्यात करायचा आणि त्याच कच्च्या मालापासून वस्तू बनवून त्या भारतात आणून विकायच्या, हे चालणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयात-निर्यातदारांना आणि कंपन्यांना दिला आहे. भारतातील कच्चा माल उपयोगात आणायचा असेल तर भारतातच या मालावर प्रक्रिया करुन वस्तू बनवाव्या लागतील, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी त्यांच्या हस्ते ‘उत्कर्ष ओडीशा, मेक इन ओडीशा’ समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी भाषण करताना त्यांनी हा इशारा दिला आहे. केवळ कच्चा माल निर्यात केल्याने देशाची प्रगती होणार नाही. कच्च्या मालापासून अंतिम उपयोगाची वस्तू बनवून ती निर्यात केल्यास भारताला मोठा लाभ होणार आहे. पूर्व भारत हे भारताचे विकास इंजिन आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनीज संपत्ती आहे. या संपत्तीचा उपयोग देशाच्या विकासासाठी करायचा असेल तर खनीज संपत्तीपासून येथेच वस्तू किंवा साधने बनावयास हवीत, हा भारताच्या ‘मेक इंन इंडिया’ या धोरणाचा अर्थ आहे, असे महत्वाचे प्रतिपादन त्यांनी केले.
भारत विकासपथावर…
भारतातील कोट्यावधी नागरीकांच्या इच्छाशक्तीमुळे आणि प्रयत्नांमुळे आज भारत विकास मार्गावर वेगाने अग्रेसर होत आहे. ओडीशा राज्य या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे. हे राज्य लवकरच विकासाची नवी नवी शिखरे गाठण्यास प्रारंभ करणार आहे. या राज्याचा कल्पनातीत विकास होण्याची पुरेपूर शक्यता आहे. भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील उद्योजकांनी आणि मोठ्या उद्योगांनी हे ध्येय साध्य करण्यासाठी पुढे यावे. ओडीशात त्यांना सर्व प्रकारची सुविधा आणि संधी देण्यात येईल. या राज्यातील जुनी बंदरे पुनरुज्जीवीत करण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला 7 हजार 500 प्रतिनिधी उपस्थित आहेत.
कॉन्सर्ट इकॉनॉमीचा विकास व्हावा
भारतात ‘लाईव्ह कॉर्न्सटस् साठी मोठी संधी आहे. नुकतेच मुंबई आणि अहमदाबाद येथे शानदार ‘ब्रिटीश बँड कोल्डप्ले’चे संगीत कार्यक्रम झाले आहेत. या कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यावरुन भारतात अशा कार्यकमांमध्ये लोकांना खूपच स्वारस्य आहे, हे स्पष्ट होत आहे. भारतात सरकारांनी आणि खासगी कंपन्यांना अशा ‘कॉन्सर्ट इकॉनॉमी’ला पाठिंबा दिला पाहिजे. तसेच त्यांनी असे कार्यक्रम आयोजित करता यावेत अशा प्रकारच्या पायाभूत सुविधाही निर्माण कराव्यात, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर येथील ‘उत्कर्ष ओडीशा’ कार्यक्रमात केले. अशा संगीत सभा अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकतात, असेही प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात केले.









