कोल्हापूर :
कसबा बावडा लाईन बझार येथे झूम प्रकल्पावर गेले दोन तीन दिवस आग लागून ती धुमसत होती. शनिवारी आगीने रौद्ररुप धारण केले. यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. सलग आठ ते दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर महापालिकेला झुम येथील कचऱ्याची आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, सोमवारी सकाळी मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी झूम प्रकल्पाची पाहणी केली. उन्हाळा सुरू होणार असल्याने भविष्यात अशा प्रकारची आग लागू शकते, ती लागू नये याची काळजी घ्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना करा अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली.
मागील आठवडाभर धुमसणाऱ्या झूम प्रकल्पातील कचऱ्याने शनिवारी सकाळी मोठ्या आगीचे रुप घेतले. ओला आणि वाळा तसेच प्लास्टिक एकत्रपणे टाकले जात असल्याने कचरा धुमसला आणि त्यांनतर मोठी आग लागली. एकत्रित कच्रयामुळे जीव गुदमरेल इतका धूराचे लोट लाईनबझार, सर्किट हाउस परिसरात पसरले होते. शनिवारी सायंकाळी आणि रात्रभर या परिसरात धुराचे साम्राज्य होते. कुबट वास आणि धुरामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. परिसरातील नागरिकांना घरांची दारे खिडक्या बंद कराव्या लागल्या. धुरामुळे अनेकांना खोकला आणि घसा दुखीचा त्रास सुरू झाला आहे.
आग आटोक्यात आणण्यात महापालिकेला यश आले आहे.तरीही कचऱ्यावर पाणी मारण्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे.
या ठिकाणी फिरती करताना प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजावून घेतल्या. या ठिकाणी कंपाउंडवर सुरू असलेल्या पत्र्याच्या आडोशाचे काम जे सुरू आहे ते अष्टेकरनगर या ठिकाणी तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच झूम प्रकल्पा बाहेरील रस्त्यावर पडलेला कचरा उठाव करून आत प्रक्रियेसाठी पाठवावा. या ठिकाणी ऑटो टिपर येताना रस्त्यामध्ये कुठेही कचरा पडणार नाही याची दक्षता घ्या. तसेच मटण मार्केटमधील कचरा त्या ठिकाणी उघड्यावर न टाकता विंडो शेडमध्ये प्रक्रिया करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक यांना दिल्या. तसेच या परिसरातील रस्त्यावर लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, उप– शहर अभियंता रमेश कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, आदी उपस्थित होते.








