एकुलता आधार हरपल्याने आईचा हृदयद्रावक आक्रोश
खानापूर : बेळगाव तालुक्यातील मण्णूर येथील समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय 22) या युवकाचा खानापूर येथील मलप्रभा नदीघाटानजीक बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. 26 रोजी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 5 च्या दरम्यान मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. अवघ्या दीड वर्षात पती आणि मोठ्या मुलग्याचे निधन झाले होते. आणि आता समर्थचा बुडून मृत्यू झाल्याने निराधार झालेल्या आईने एकच हंबरडा फोडला. यावेळी उपस्थित असलेले पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि नागरिक गहिवरून गेले होते.
मण्णूर येथील काही ग्रामस्थ यल्लम्मा देवीच्या परड्या भरण्यासाठी आणि धार्मिक विधीसाठी रविवार दि. 26 रोजी खानापूर येथील मलप्रभा नदीघाटावर आले होते. दुपारी 12 च्या दरम्यान घाटाच्या पलीकडील बाजूस पूजाविधी सुरू असताना समर्थ हा आपल्या काही मित्रांसोबत अंघोळीसाठी घाटावरून नदी पात्रात उतरला. मात्र अडवलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. काही क्षणातच समर्थ हा पाण्यात बुडाल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करता आले नाहीत. आपला एकुलता एक मुलगा बुडाल्याचे समजताच समर्थच्या आईने एकच टाहो फोडला होता.
खानापूर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. समर्थचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पाणी अडवल्याने पातळी खोल आहे. तसेच पाणी गढूळ असल्याने मृतदेह शोधण्यास अनेक अडचणी येत होत्या. दोन तास प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाचे राठोड यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन बचाव पथकातील बसवराज हिरेमठ, पद्मप्रकाश हुली, अभिषेक येळळूरकर, गौतम शराफ, मारुती कवळी, हेश कुमार यांनी कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम हाती घेतले. कॅमेऱ्यामुळे मृतदेहाचा शोध काहीवेळातच लागला. अग्निशमन दलाच्या आणि रेस्क्यू टीमच्या जवानानी मृतदेह नदीपात्राबाहेर काढला. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक लालसाहब गवंडी यांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा मण्णूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावात हळहळ
समर्थची आई आशा कार्यकर्त्या असून आईला असलेला आधारच संपल्यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हा युवक गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात भाग घेत होतो. त्यामुळे युवकांतूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.









