पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पत्रकार परिषदेत वक्तव्य : 300 कोटी निधी लागणार
बेळगाव : बेळगावात ओव्हरब्रिज उभारण्याची घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. ध्वजारोहणानंतर रविवारी जिल्हा क्रीडांगणावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली आहे. ओव्हरब्रिज उभारण्यासाठी आम्ही अनेकवेळा केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे ही योजना रखडली आहे. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला नाही तर राज्य सरकारकडूनच ओव्हरब्रिज उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी 300 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
केंद्राने दखल घेतली नाही तर वर्षाला 100 कोटी रुपयेप्रमाणे 300 कोटी रुपयांची तरतूद करून राज्य सरकारकडूनच काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगावात नवी वसाहत उभारणे कठीण आहे. त्यामुळे कायदेशीररीत्या वसाहत उभारणाऱ्या खासगी व्यक्तींना सहकार्य करणे योग्य ठरणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून कणबर्गी येथे वसाहत उभारणे शक्य होत नाही. काहीजणांनी न्यायालयातून मनाई मिळवली आहे, असे सांगतानाच गॅरंटी योजनांमुळे बस तिकीट दरवाढ वगळता इतर कोणतीही वाढ केली नाही. इतर राज्यांच्या तुलनेने कर्नाटकात बसदर भाडेही कमी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
‘मायक्रो फायनान्स’ संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना
मायक्रो फायनान्सच्या वाढत्या उपद्रवांबद्दल बोलताना यमकनमर्डी, गोकाक, हुक्केरी येथे मायक्रो फायनान्स चालकांनी नागरिकांना त्रास दिला आहे, असा आरोप आहे. संबंधितांनी पोलीस स्थानकात तक्रार करावी. तक्रारीनंतर नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही मायक्रो फायनान्सवर लगाम घालण्यासाठी कायदा आणण्याचे सांगितले आहे. आपणही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना पोलिसांना केल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.









