कचऱ्याच्या उचलीसाठी 151 ट्रिप, वर्गीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश
बेळगाव : महापालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या शहर आणि उपनगरात दररोज 189.200 टन कचऱ्याची निर्मिती होत असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दररोज 151 वाहने तुरमुरी कचरा डेपोला पाठवली जात आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असले तरीही अद्याप म्हणावे तसे उद्दिष्ट गाठता आलेले नाही. बाजारपेठेसह शहर आणि उपनगरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा तयार होत आहे. यापूर्वी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याआधीच मिश्रित कचरा जमा करून तो तुरमुरी कचरा डेपोला पाठविण्यात येत होता. मात्र, मनपा आयुक्त शुभा बी. यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. पण अद्यापही म्हणावे तसे उद्दिष्ट गाठण्यात आलेले नसून केवळ 70 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे. याबाबत जनजागृती करण्यासह अधिकाऱ्यांनाही कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत सूचना केल्या जात आहेत. महापालिकेतून उपलब्ध आकडेवारीनुसार शहरात दररोज 189.200 टन कचरा तयार होत आहे. दक्षिण विभागात 41.200 टन, उत्तर विभागात 45.20 टन कचरा तयार होत आहे.
सुका कचरा
दक्षिण विभागात 17.660 टन सुका कचरा तयार होत असून त्यासाठी 39 ट्रिप, उत्तर विभागात 17.210 टन कचरा तयार होत असून त्यासाठी 17 ट्रिप, ग्राम पंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांकडून 600 किलो कचरा टाकला जात असून त्यासाठी दररोज दोन ट्रिप असा एकूण 35.470 टन सुका कचरा तयार होत आहे. यासाठी 58 ट्रिप तुरमुरी कचरा डेपोकडे पाठविल्या जात आहेत.
ओला कचरा
दक्षिण विभागात 25.810 टन ओला कचरा तयार होत असून त्यासाठी 39 ट्रिप, उत्तर विभागात 33.620 टन कचरा तयार होत असून त्यासाठी 22 ट्रिप असा एकूण 59.430 टन ओला कचरा तयार होत आहे. या कचऱ्याची उचल करण्यासाठी 61 ट्रिप वाहने कचरा डेपोकडे पाठवली जात आहेत. एकंदरीत दिवसाकाठी शहरात 189.200 टन इतका कचरा तयार होत आहे.









