सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त कार्यक्रम
बेळगाव : शहापूर, कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त मंगळवार दि. 28 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे व्याख्यान होणार आहे. ‘लाईफ इज फन-मेक इट क्रिएटिव्ह’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. राज्य मराठी विकास संस्था, मुंबईच्या अनुदान योजनेंतर्गत हा कार्यक्रम होत आहे. ज्ञानेश्वर मुळे यांचा जन्म वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबामध्ये अब्दुललाट येथे झाला. कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले. 1983 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये ते रुजू झाले व अनेक पदांवर काम केले. भारताचे वाणिज्य दूत, न्यूयॉर्क आणि भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली.
35 वर्षे काम करून ते निवृत्त झाले. 2019 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आपल्या अनुभवांवर त्यांनी ‘माती, पंख आणि आकाश’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील कला अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी पंधराहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांचा अनुवाद अरबी, धिवेही, उर्दू, कन्नड व हिंदीमध्ये झाला आहे. आपल्या मूळ गावी त्यांनी बालोद्यान, अनाथाश्रम व ग्लोबल एज्युकेशन अशा नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या आहेत. एज्युकेशन सोसायटीसह अनेक सामाजिक, शैक्षणिक प्रकल्पांना त्यांनी प्रेरणा दिली आहे.









