खानापूर : खानापूर शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सोसायट्या, विविध संघ-संस्था आदी ठिकाणी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. खानापूर येथील मलप्रभा मैदानावर झालेल्या सार्वजनिक प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झाले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खानापूर पोलीस स्थानक आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवानांनी पथसंचलन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांचे पथसंचलन झाले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी शहरातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनांना रोख बक्षिसे आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तालुक्यात सर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालये, ग्राम पंचायती, शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. काही गावातून प्रभातफेरी काढून व मिठाई वाटून आनंदोत्सव करण्यात आला.
खानापूर तालुका माजी सैनिक संघटना
खानापूर तालुका माजी सैनिक संघटना आर्मी, नेव्ही व एअरफोर्सच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवृत्त सुभेदार यशवंत सीमनगौडर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग मेलगे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. कार्याध्यक्ष गोपाळ देसाई यांनी स्वागत केले. शिवाजी चौगुले, परशराम पाटील आदींची भाषणे झाली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. नारायण झुंजवाडकर यांनी आभार मानले.
रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय
येथील रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्या शरयू कदम होत्या. लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी प्रतिमेचे पूजन झाले. संचालक सुबोध गावडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. कॉलेजची माजी विद्यार्थिनी आश्विनी देसाई हिची सैन्यात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार पंढरी परब यांच्या हस्ते झाला. यावेळी राजू नाईक, डॉ. डी. एम. मिसाळे, अरुण बडीगेर, प्राध्यापक तसेच सोसायटीचे व्यवस्थापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.









