अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर प्रथमच संवाद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर प्रथमच दोन्ही नेत्यांमध्ये अशी चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, व्यापार आणि संरक्षण आदी विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांच्या ऐतिहासिक विजयासंबंधी अभिनंदन केले.
सोमवारी झालेल्या या चर्चेत ‘क्वाड’ संबंधीही बोलणी करण्यात आली. ‘क्वाड’ ही संघटना अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या सहभागाने निर्माण झालेली आहे. भारत-प्रशांतीय (इंडो पॅसिफिक) क्षेत्रात कोणत्याही एका देशाचा अधिकार असू नये. हा प्रदेश सागरी संचारासाठी मुक्त असला पाहिजे हे या संघटनेचे ध्येय आहे. चीनच्या वाढत्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.
परस्पर लाभासाठी कार्य करणार
भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश भविष्यकाळात परस्पर लाभ हितांच्या रक्षणसाठी एकत्रितरित्या काम करणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध आगामी काळात अधिक दृढ होणार आहेत. आम्ही आमच्या जनतेच्या भल्यासाठी आणि जागतिक शांततेसाठी एकत्र कार्य करणार आहोत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेनंतर ‘एक्स’ च्या माध्यमातून प्रसारित केला आहे.
निर्णयांचा धडाका
डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर 24 तासांमध्येच त्यांनी अनेक महत्वाचे प्रशासकीय आदेश लागू केले आहेत. त्यांच्या या धडाक्यामुळे जगात एक नवीन वातावरण निर्माण झाले असून अनेक देश सावधपणे त्यांच्या पुढच्या निर्णयांकडे पहात आहेत.
जयशंकर यांचा दौरा
ट्रम्प यांच्या शपथविधीला भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर उपस्थित राहिले होते. नंतर त्यांनी अमेरिकेच्या नव्या प्रशासनातील परराष्ट्र व्यवहारमंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली होती. त्यानंतर, क्वाड देशांच्या प्रतिनिधींशीही त्यांची चर्चा झाली होती. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट चर्चा झाली नव्हती. सोमवारी ती झाली आहे. या चर्चेमुळे भारत-अमेरिका संबंधांना नवी झळाळी प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. यंदा एप्रिलमध्ये क्वाडची बैठक भारतात आहे. या बैठकीला ट्रम्प उपस्थित राहणार का, यासंबंधी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही अमेरिकेच्या दौऱ्यावर कधी जाणार, हाही चर्चेचा विषय आहे.









