वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाने सोमवारी दिल्लीसाठी पक्षाच्या 15 हमी योजना जाहीर केल्या. याचदरम्यान पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यमुना स्वच्छ करण्याचे आणि दिल्लीचे रस्ते युरोपसारखे बनवण्याचे आश्वासन पूर्ण करू न शकल्याबद्दल माफी मागितली. 2020 मधील निवडणुकीपूर्वी त्यांनी हे आश्वासन दिले होते. आता नजिकच्या काळात ही आश्वासने पूर्ण करण्याचेही पक्षाचे स्वप्न असल्याचे केजरीवाल म्हणाले.
अपूर्ण राहिलेल्या आश्वासनांबाबत केजरीवाल यांनी सोमवारी मोकळेपणाने भाष्य केले. ‘आज मी कबूल करतोय की गेल्या 5 वर्षात मी काही आश्वासने पूर्ण करू शकलो नाही. सुरुवातीला कोरोना अडीच वर्षे टिकल्यानंतर केंद्र सरकारने मला तुरुंगात टाकण्याचा खेळ खेळला. माझी संपूर्ण टीम पांगली, पण आता आम्ही तुरुंगाबाहेर आहोत’, असे ते म्हणाले. दिल्लीत 24 तास मोफत वीज, मोफत पाणी, मोफत शिक्षण, वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा, महिलांसाठी मोफत बस प्रवास, रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत उपचार सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.









