कोल्हापूर :
मागील केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोने व चांदीवरील आयात ड्युटी 15.45 टक्क्यांवरून 6 टक्के केल्याने, बाजारात सोने व चांदीचा दर स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली होती. एकीकडे आयात ड्युटी कमी झाली असताना, आता दुसरीकडे डॉलरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आयात ड्युटीने सोने–चांदी दराला तारले असतानाच, आता डॉलरच्या वाढत्या दराने ग्राहकांना मारले असल्याची भावना व्यक्त होत आहे. सोन्या–चांदीचा दर कमी न होता उलट वाढतच आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांच्या नजरा आता येत्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत.
मागील अर्थंसंकल्पामध्ये आयात ड्युटी कमी झाल्याने, त्याच दिवशी सायंकाळी सोने व चांदी दर कमी होऊन स्वस्त झाले होते. सोने 10 ग्रॅममागे 3300 रूपये तर चांदी किलोला 3100 रूपयांनी स्वस्त झाली होती. अवघ्या पाच दिवसांमध्ये सोने 4500 रूपयांनी तर चांदी 6600 रूपयांनी स्वस्त झाली होती. सोने, चांदीवरील आयात ड्युटी कमी व्हावी यासाठी सराफ व्यावसायिकांकडून मागणी होत होती. मागील अर्थंसंकल्पामध्ये 9 टक्के आयात ड्युटी कमी झाल्याने सराफ व्यावसायिकामध्ये समाधानाचे वातावरण होते. आयात ड्युटी कमी झाल्याने, परदेशातून होणारी सोने, चांदीची तस्करी कमी होणार होती.
अर्थंसंकल्पापूर्वीं अवघ्या पाच दिवसांपूवीं सोने 76100 रूपये तोळे तर चांदी 94100 रूपये किलो असा दर होता. त्या पाच दिवसांमध्ये सोने 4500 रूपये तर चांदी 6600 रूपयांनी स्वस्त झाली आहे. पुढील महिन्यात केंद्रीय अर्थंसंकल्प सादर होणार आहे. या वर्षांच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी सोने दर 78500 रूपये तर चांदीचा दर 88300 रूपये असा होता. 23 जानेवारी 2025 रोजी सोने 82500 रूपये तर चांदी 92500 रूपये किलो अशी झाली आहे. त्यामुळे तीन आठवड्यात सोने 4000 रूपये तर चांदी 4200 रूपयांनी महागली आहे. याचे कारण गेल्या महिन्यापासून डॉलरच्या दरात सतत वाढ होत असल्याने, त्याचा परिणाम सोने–चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे सराफ बाजारातून सांगितले जात आहे.








