इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल
400 फ्लॅशकार्ड ओळखून मिळवले यश
गडहिंग्लज :रोहित ताशिलदार
ज्या वयात मुलांना नीट चालता-फिरता येत नाही अशा वयात एका चिमुकलीने आपल्या बुध्दीकौशल्यावर ताण देत 1 वर्ष 6 महिन्यातच थेट इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. हेब्बाळ कसबा नूल येथील वृंदा आप्पासाहेब सोलापूरे असे या चिकुमलीचे नाव आहे. तिच्या यशाने आई-वडिलांसह गडहिंग्लज तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
सध्या कळी उमलताना तिला मारले जात असल्याचा घटना ताज्या असताना ग्रामीण भागातील वृंदाची आई रिया आणि वडिल आप्पासाहेब दोघेही उच्च शिक्षित असल्याने तिच्यावर चांगले संस्कार करण्याचे ठरवले. वर्षपुर्तीलाच तिच्यातील कसब ओळखत तिला पक्षी, फुले, रंगाची ओळख करून देणे सुरू केले. इतक्या लहान वयात अनपेक्षितरित्या तिच्याकडून येणारी उत्तरे ही तिच्यातील कौशल्य दाखवून देत होती. हीच नाळ पकडत आई-वडिलांनी तिच्याकडून दररोज फळे, फुले, रंग, विविध देशाचे ध्वज, कार्टुन, संगीत साहित्य, महनीय व्यक्ती, वाहने, भाजी, पक्षी, प्राण्याची ओळख करून घेतली. दोन महिन्यानंतर तिची आई रिया यांनी तिच्यातील क्षमतेला राष्ट्रीय व्यासपीठ देण्याचे ठरवले.
त्यानुसार तिच्याकडून 32 देशांचे ध्वज, 17 प्रकारचे पक्षी, 42 प्राण्यांची ओळख, 29 फळांची ओळख, 18 संगीत साहित्याची ओळख, 7 जगप्रसिध्द पुतळे, 7 देशांची ओळख, 10 चित्रांची ओळख, 18 वाहनांची ओळख, 20 प्रकारच्या भाज्या ओळखणारा तिचा व्हिडीओ तयार करून इंडिया बुक ऑफ रेकार्डच्या वेबसाईवर अपलोड केला. त्यांच्या कमिटीकडून अटी आणि शर्तीपूर्ण केल्या. त्यानंतर आयबीआरच्या कमिटीकडून परीक्षण करून देशात कमी वयात इतक्या जलदरित्या 400 हून अधिक फ्लॅशकार्ड ओळखणारी मुलगी असल्याचे जाहीर करत हा किताब आपल्या नावावर केला. डिसेंबर महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून नुकताच आयबीआरच्या कमिटीकडून तिला सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे. तिला फरिदाबाद येथील दीक्षांत समारंभ उपस्थित राहण्याचे आमंत्रण आल्याचे तिच्या आई-वडिलांच्याकडून सांगण्यात आले आहे.








