कसबा बावडा / सचिन बरगे :
महाराष्ट्र विद्यालय, महापालिका शाळा क्रमांक 25. स्थापना 1960 ची. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या या विद्यालयात सध्या एकूण 45 विद्यार्थी शिकत आहेत. इतकी कमी विद्यार्थी संख्या असण्याचे कारण म्हणजे या शाळेत एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षिका आहे. शाळेत शिक्षकच नाहीत तर विद्यार्थी कोठून येणार ! शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांनी या शाळेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
कसबा बावडा येथील भाजी मंडई परिसरात पॅव्हेलियन मैदानाला लागून महापालिकेचे शाळा क्रमांक 25 चे महाराष्ट्र विद्यालय आहे. गेली 65 वर्ष अविरत सुरू असलेल्या या विद्यालयाची एकूण बारा वर्ग असलेली मोठी इमारत आहे विद्यार्थ्यांसाठी चार स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. शाळेच्या बाजूलाच खेळासाठी मोठे पॅव्हेलियन मैदानही उपलब्ध आहे. अशा सर्व सोयीनियुक्त असलेल्या महाराष्ट्र विद्यालयाची सध्या परिस्थिती फारच बिकट आहे. पहिली ते सातवी पर्यंतच्या या शाळेमध्ये एकूण 45 विद्यार्थी शिकत आहेत. महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी असण्याची कारणे अनेक असून त्यापैकी या शाळेमधील शिक्षकांची कमतरता हे एक प्रमुख कारण समोर आले आहे.
या विद्यालयात एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षिका असून शिक्षकांच्या अभावामुळे पहिली ते सातवी पर्यंतच्या एकूण 45 विद्यार्थ्यांना दोन खोल्यांमध्ये शिकवले जाते. इमारतीमधील बाकीच्या खोल्या वापराविना पडून आहेत. चार स्वच्छतागृहांपैकी सध्या एकच चालू स्थितीमध्ये आहे. स्लॅब गळतीमुळे पावसाळ्यात काही वर्गात पाणी साचते. महापालिकेकडून शाळा खर्चासाठी देत असलेल्या रकमेत शाळेची डागडुजी होणे शक्य नसल्याचे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले. तसेच शाळा प्रशासनाने महापालिकेकडे वारंवार कळवूनही याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. परिणामी अशा गैरसोयीच्या विद्यालयात पालकांनीही पाठ फिरवली असल्यामुळे सध्या या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या फारच कमी आहे. हे चित्र असेच कायमस्वरूपी राहिल्यास कालांतराने 65 वर्षाची ही महापालिकेची शाळा इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही. या शाळेची योग्य ती काळजी घेऊन शाळेमध्ये आवश्यक शिक्षक वर्ग नेमल्यास विद्यार्थ्यांची संख्या वाढून ही शाळा पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी आदर्श ठरेल असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
- शाळेच्या इमारतीचा वापर मद्यपानासाठी
बाराखोल्या असलेल्या महाराष्ट्र विद्यालयात सध्या विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे दोनच खोलीत वर्ग भरवले जातात. उर्वरित खोल्या वापराविना बंदच आहेत. पण सध्या काही मद्यपी या शाळेच्या मागील बाजूच्या पाय्रयांवर दिवसा ढवळ्या मद्यपान करताना आढळून आले आहेत. शाळेच्या आवारात मध्यपान करण्रायांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.
- पालकांनी शाळेकडे पाठ फिरवली
- खासगी शाळांमुळे महापालिकेच्या शाळांकडे पालकांचा ओढा कमी होताना दिसत आहे. या कारणाबरोबरच शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी संख्येत घट झाल्याचे काही ठिकाणी दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे आमच्या
महाराष्ट्र विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. याठिकाणी शिक्षकांची कमतरता असल्यामुळे पालकांनी या शाळेकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या आमच्या शाळेत एक मुख्याध्यापक एक शिक्षिका व एक शिपाई असे तीनच कर्मचारी आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार माहिती दिली असून संच मान्यतापटानुसार शिक्षक नेमले जाणार असल्याचे सांगितले आहे.
मुख्याध्यापक : शिवराज नलवडे
विद्यार्थी संख्या वाढवा मग शिक्षक वाढवू : मनपा
विद्यालयात सध्या दोनच शिक्षक कार्यरत असून येथे विद्यार्थी संख्या कमी आहे. शाळा प्रशासनाने याबाबत सूचना करून शिक्षक कर्मचारीवर्ग वाढवल्यास विद्यार्थी संख्येत वाढ होईल, असे महापालिकेला कळवले. यावर संच मान्यतापटानुसार पहिल्यांदा शाळेत विद्यार्थी संख्या वाढवा मगच शिक्षक कर्मच्रायांत वाढ करू असे महापालिकेकडून सांगण्यात आले. यावरून शिक्षक आधी का विद्यार्थी म्हणजे मराठी म्हणीनुसार कोंबडी आधी का अंडे अशी मनपाची अवस्था झाल्याचे दिसून येते.








