कोल्हापूर / विनोद सावंत :
जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी 20 हून अधिक नागरिकांनी आत्मदहन करणार असल्याच्या इशाऱ्याची पत्र दिली आहेत. यामुळे पोलिसासह अग्निशमन दलाची तारांबळ उडाली आहे. प्रशासकीय पातळीवर त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतू यामध्ये इशारा देणाऱ्यांना न्याय मिळणार की पुन्हा केवळ आश्वासन हे पाहणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त नागरिक येत असतात. या कार्यालयांच्या फेऱ्या मारूनही काहींची कामे होत नाहीत. वारंवार भेटून, निवेदन देऊन, निदर्शने करूनही प्रशासनाचे मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने यापैकी काहीजण टोकाची भूमिका घेत थेट आत्मदहन करण्याचा निर्धार करतात. प्रशासनाला तशा इशाऱ्याचे पत्रही दिले जाते. वर्षभरात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी रोजीसह अन्य दिवशी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारे 100 हून अधिक जणांनी आत्मदहनाचे इशाऱ्याचे पत्र दिली आहेत. यापैकी काहींची कामे मार्गी लागली आहेत. परंतू काहींची कामे प्रलंबित राहिल्यानी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अशांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची समजूत काढून सोडून दिले आहे.
यंदाच्या रविवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी 30 हून अधिक आंदोलनाची पत्र प्रशासकीय कार्यालयांना आली आहेत. यामध्ये 20 हून अधिक आत्मदहनाच्या इशाऱ्याची निवेदने आहेत. यामध्ये सर्वाधिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाबतची आहेत. याचबरोबर जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालया, आयजी ऑफीस यांच्याशी संबंधितही आत्मदहनाच्या इशाऱ्याची पत्रे आहेत.
- आत्मदहनाचा इशारा देणाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
व्यायाम शाळेतील घोटाळा, तलाटी त्रास देतात. अतिक्रमणावर कारवाई करणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, चौकशी अहवाल पाठवणे, बँकेची जप्ती तक्रार, भुसंपादन मोबदला, जमिन संपदानाचा मोबदला न मिळणे
- चुक कोणाची त्रास कोणाला?
एकीकडे राज्य शासन नागरिकांची कामे जलद गतीने करा, असे आदेश देते. परंतू प्रशासकीय पातळीवर काही बाबतीत हलगर्जीपणा केला जातो. काही नागरिकांचे प्रश्न सहजरित्या मार्गी लागू शकतात. परंतू लालफितीचा कारभारामुळे हे शक्य होत नाही. त्यामुळे न्याय, हक्कासाठी नागरिकांना आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र, अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनाला बसत आहे. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या परिसरात अग्निशमन दल, रूग्णवाहिकेसह पोलिस फौजफाटा दिवसभर यंत्रणा अलर्ट ठेवावी लागते. ‘चुक कोणाची आणि त्रास कोणाला’ अशी स्थिती होते.
आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. संबधित व्यक्ती कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये तसेच दक्षता म्हणून त्यास ताब्यात घेतले जाते. त्याचे प्रथम समुपदेशन करतो. यानंतरही त्यांनी ऐकले नाही तर मात्र, न्यायालयासमोर त्यास हजर केले जाते.
संतोष डोके, पोलिस निरिक्षक, शाहूपुरी पोलीस स्टेशन
आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून महापालिकेच्या अग्निशमन दलास पत्र दिले जाते. त्यानुसार ज्या दिवशी इशारा दिला असतो त्या दिवशी अग्निशमन दलाचे जवान वाहनांसह त्या ठिकाणी तैनात केले जातात. एकाच दिवशी जास्त ठिकाणी अशा प्रकारचे इशारे दिले असतात. अशा इतर ठिकाणी अग्निशमन दलातील बुलेटसह कर्मचारी तैनात केले जातात.
मनिष रणभिसे, अग्निशमन दल प्रमुख, महापालिका








