कोल्हापूर :
एसटी महामंडळाने प्रस्तावित केलेला 15 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव अखेर शुक्रवारी राज्यशासनाने मंजूर केला. शुक्रवारी रात्री 12 नंतरच नवीन दरानुसार भाडे आकारणी सुरू झाली आहे. या नवीन दरानुसार कोल्हापूर–मुंबई तब्बल 90 रूपये तर कोल्हापूर–पुणे 53 रूपयाने तिकीट दरात वाढ झाली आहे.
एसटीचे दरवाढीचे आदेश मिळताच कोल्हापूर एसटी विभागातील प्रशासकीय यंत्रणा नवीन दरानुसार तिकीट आकारणी प्रक्रिया सुरू केली. 12 आगारामध्ये मशिनमध्ये अपडेट करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
एकीकडे राज्यशासनाने महिला सन्मान योजनेतून महिलांना 50 टक्के सवलत दिली होती. आता त्यांच्या तिकीटामध्येही 15 टक्के वाढ होणार आहे. यामुळे महिलांना आता 35 टक्के सवलत मिळणार अशी स्थिती आहे. एसटी महामंडळाने खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेतला म्हटला असला तरी नियमित एसटीने प्रवास करणारे या निर्णयामुळे नाराज झाले आहेत.
- सुट्ट्यासाठी होणार वाद
कोल्हापूर आगारातून सुट्टणाऱ्या बहुतांशी एसटी बसचे सध्याचे दर सम संख्येत होते. उदाहरणार्थ कोल्हापूर–सांगली 70, कोल्हापूर–पंढरपूर 260, इचलकरंजी 40, गडहिंग्लज 90 असे होते. आता दरात वाढ झाल्याने हेच दर कोल्हापूर–सांगली 81, कोल्हापूर–पंढरपूर 303, इचलकरंजी 46, गडहिंग्लज 102 झाले आहेत. यामुळे सुट्ट्या पैशावरून प्रवासी आणि ग्राहकांमध्ये वाद होण्याची दाट शक्यता आहे.
- तिकीट दरवाढीनंतर एसटी फायदात येणार का?
तीन वर्ष दर वाढ केलेली नाही. तसेच सध्या एसटीला महिन्याला 90 कोटींचा तोटा होत असल्याने दरवाढ केल्याचे प्रशासन सांगत आहे. 15 टक्के वाढीनंतर तरी एसटी फायदात येणार काय असा सवाल उपस्थित होत आहे. दर वाढीमुळे नेमके प्रवासी संख्येवर काय परिणाम होणार यावर हे स्पष्ट होणार आहे.
- कोल्हापूर आगारातील प्रमुख मार्गावरील एसटीबसचे नवीन दर
मार्ग जुना दर नवीन दर
कोल्हापूर–सांगली 70 81
कोल्हापूर–पंढरपूर 260 303
कोल्हापूर–सोलापूर 375 433
कोल्हापूर–इचलकरंजी 40 46
कोल्हापूर–गडहिंग्लज 90 102
कोल्हापूर–वठार 30 36
कोल्हापूर–सातारा 185 212
कोल्हापूर–कराड 105 122
कोल्हापूर–पुणे 330 383
कोल्हापूर–मुंबई 565 654
कोल्हापूर–चंदगड 160 182
कोल्हापूर–कागल 25 31
कोल्हापूर–गगनबावडा 90 102
कोल्हापूर–राधानगरी 80 91
कोल्हापूर–गारगोटी 80 91
कोल्हापूर–मलकापूर 70 81
कोल्हापूर–कुरूंदवाड 80 91








