महापालिकेत दबक्या आवाजात चर्चा : प्रामाणिक अधिकाऱ्यांमध्ये नाराजी
बेळगाव : व्यापार परवान्यांसह इतर कारणांवरून गुरुवारच्या आरोग्य स्थायी समितीत विशेष करून मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. नगरसेवक म्हैसूरच्या अभ्यासदौऱ्याला जाण्यापूर्वी घडलेल्या काही घडामोडी गुरुवारची बैठक वादळी ठरण्यास कारणीभूत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला व्यापार परवान्याच्या माध्यमातून महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, विविध कारणांमुळे उद्दिष्ट गाठण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे काही सदस्य म्हैसूरच्या अभ्यासदौऱ्यावर जाणार होते. दौऱ्यावर जाण्यापूर्वी काही नगरसेवकांचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी काही महत्त्वाच्या व्यवहारातून बिनसले होते.
त्यावेळी अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना योग्य मानपान न दिल्याच्या कारणावरून काही सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत धूसफूस सुरू होती. हाच धागा पकडत गुरुवारच्या बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ‘खायापिया कुछ नहीं, ग्लास तोडा बाराआणा’ अशी परिस्थिती निर्माण झालेल्या अधिकाऱ्याने भरबैठकीतच आपल्याला सेवेतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी केल्याने सर्वांचीच चुप्पी झाली. गुरुवारच्या बैठकीनंतर पुन्हा अर्थपूर्ण व्यवहाराबाबत चर्चा झाल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. एकंदरीत अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक बैठकीत लक्ष्य केले जात असल्याने अधिकारीवर्गांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मनपातील काही अधिकारी लोकप्रतिनिधींना खूश ठेवत गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. पण काही अधिकारी प्रामाणिक सेवा बजावत असून त्यांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.









