बाळंतीण-शिशुला मिळाला पुन्हा आसरा
बेळगाव : तारिहाळ, ता. बेळगाव गावातील एका बाळंतिणीला आणि नवजात शिशुला मायक्रो फायनान्स कंपनीकडून घराबाहेर काढून घराला टाळे ठोकण्यात आले होते. ही बाब गांभीर्याने घेत महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संबंधित फायनान्स कंपनीबरोबर चर्चा करून घरचे टाळे खोलण्याची विनंती केली. त्यामुळे घराबाहेर काढलेल्या बाळंतिणीला पुन्हा आसरा मिळाला आहे. तारिहाळ गावात मायक्रो फायनान्समधून कर्ज घेतलेल्या महिलेला तिच्या बाळासह घराबाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे गणपत लोहार यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. अचानक घराला टाळे ठोकण्यात आल्याने ही बाब सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याची दखल घेत आपले साहाय्यक महांतेश हिरेमठ यांच्याकरवी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर घराला ठोकण्यात आलेले टाळे खोलण्यात आले. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.









