निवडणूक होऊन साडेसात वर्षे लोटूनही अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीचा घाट : उच्च न्यायालयात दाद मागणार
खानापूर : संविधानाच्या मार्गदर्शनानुसार देशातील कोणत्याही लोकप्रतिनिधींचा कालावधी हा पाच वर्षाचा निश्चित करण्यात आला आहे. असे असताना खानापूर नगरपंचायतीची निवडणूक होऊन आजच्या घडीला साडेसात वर्षे पूर्ण झालेली आहेत. असे असताना पुन्हा अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असून यासाठी सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी चर्चा करण्यात येत असून कोणत्या आधारे दावा दाखल करता येईल, हे पाहून कर्नाटक उच्च न्यायालयात नगरपंचायतीच्या कालावधी विरोधात दाद मागणार असल्याचे नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, नगरपंचायतीच्या नगरसेवकपदाची निवडणूक होऊन साडेसात वर्षे उलटली. पहिल्या अडीच वर्षात अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड झालेली नव्हती.
त्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. त्यानंतर पुन्हा अडीच वर्षे प्रशासक नेमण्यात आला होता. त्यामुळे ही अडीच वर्षेही वाया गेली होती. हा सर्व कालावधी मिळून साडेसात वर्षे झालेली आहेत. आणि आता पुन्हा 27 तारखेला अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या नियमानुसार लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो. असे असताना नगरसेवक पदाची निवडणूक होऊन साडेसात वर्षे उलटली आहेत. पुन्हा जर अडीच वर्षाचा कालावधी मिळाल्यास एकूण साडेनऊ वर्षाचा कालावधी होतो. त्यामुळे राज्य घटनेच्या विरोधात माझे मत आहे. यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांशी या कालावधी विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चर्चा सुरू असून लवकरच या विरोधात दावा दाखल करणार आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीविरोधात सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी
खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या 27 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणूक व आरक्षणाविरोधात नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयाच्या डबल बेंच न्यायालयात दाद मागितली आहे. शासनाच्यावतीने केवीट दाखल करण्यात आले असल्याने या दाव्याची सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. 27 जानेवारी रोजी अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक पार पडली तरी या विरोधात सुनावणी होणार असून न्यायालयाच्या निर्णयानंतरच अध्यक्ष, उपाध्यक्षांचे भवितव्य ठरणार आहे.









