अमूल-गोल्ड 65 रुपये तर अमूल-फ्रेश 53 रुपये प्रतिलिटरला मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात अमूलचे दूध प्रतिलिटर एक रुपयाने स्वस्त झाले आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल फ्रेशच्या किमती कमी करण्यात आल्याचे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे (जीसीएमएमएफ) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी शुक्रवारी जाहीर केले. नवीन किमती शुक्रवार, 24 जानेवारीपासूनच लागू झाल्या आहेत. अमूलने जाहीर केलेली ही दरकपात फक्त 1 लिटरच्या पॅकवर आहे. 500 मिलीच्या पॅकवर ती उपलब्ध नाही. ग्राहकांना दिलासा देणे आणि दुधाचा वापर वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कपातीमागे दुसरे कोणतेही कारण नाही, असेही जयेन मेहता यांनी स्पष्ट केले.
नवीन बदलानंतर अमूल गोल्डच्या एक लिटर पाउचची किंमत 66 रुपयांवरून 65 रुपयांपर्यंत कमी होईल. ‘अमूल टी स्पेशल’ दुधाच्या एक लिटर पाउचची किंमत 62 रुपयांवरून 61 रुपये करण्यात आली आहे. तर ‘अमूल फ्रेश’ दुधाचा दर प्रतिलिटर 54 रुपयांवरून 53 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
दुधाचे भाव बऱ्याच काळापासून वाढत होते, पण आता दुधाचे भाव कमी झाले आहेत. अमूलने देशभरात दुधाचे दर कमी केल्याने सर्वसामान्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. अलिकडच्या काळात सर्व कंपन्यांनी दुधाचे दर वाढवले होते. मात्र, आता अमूलने दुधाचे दर कमी केल्यामुळे इतर कंपन्यांवर दुधाचे दर कमी करण्यासाठी दबाव वाढेल.









